…तोपर्यंत महाविद्यालये सुरु करता येणार नाही- उदय सामंत
जालना : कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे गेल्या दोन वर्षापासून शिक्षणाचा खेळ खंडोबा झाल्याचं चित्र आहे. शाळा , महाविद्यालये बंद असल्यानं ऑनलाईन शिकवण्या घेण्यात येत आहे. कोरोना आटोक्यात आल्यानं महाविद्यालये पुन्हा सुरू होतील अशी अपेक्षा होती. मात्र, डेल्डा प्लस व्हारियंटमुळे राज्यात पुन्हा निर्बंध लावण्यात आले आहेत. यातच आता उच्च व तंत्रशिक्षणमंत्री उदय सामंत यांनी महत्वाची घोषणा केली आहे.
लसीकरण प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत महाविद्यालये सुरु करणे शक्य नसल्याचं उच्च व तंत्रशिक्षणमंत्री उदय सामंत यांनी म्हटलं आहे. कोरोनाच्या संसर्गामुळे यंदाही शाळा आणि महाविद्यालये ऑनलाईन पद्धतीने सुरू ठेवण्यात आली आहेत. आता कोरोना रूग्णसंख्या कमी झाल्यानं महाविद्यालये सुरू करा, अशी मागणी करण्यात येत होती. मात्र लसीकरण प्रकिया अद्याप पुर्ण झाली नसल्यानं महाविद्यालयांची कुलूपं सध्यातरी बंदच राहणार आहेत.
येत्या 15 सप्टेंबरपासून महाविद्यालयीन शैक्षणिक वर्ष सुरू करण्याचा प्रयत्न करीत आहोत. याबाबत लवकरच निर्णय जाहीर केला जाणार आहे, असं उच्च व तंत्रशिक्षणमंत्री उदय सामंत यांनी सांगितलं होतं. तर आगामी शैक्षणिक वर्षात म्हणजेच 2021-22 या शैक्षणिक वर्षात शासकीय इंजिनीयरिंग महाविद्यालयांमध्ये प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांना फी व्यतिरिक्त असलेल्या इतर शुल्कामध्ये 16 हजार 250 म्हणजेच अंदाजे 25 टक्के सूट देण्याचा निर्णय घेण्यात आला होता.
दरम्यान, शिक्षक भरती प्रक्रिया अंतिम टप्प्यात असल्याचंही त्यांनी सांगितलं आहे. संवर्गानुसार भरती करायची असेल तर आदिवासी विकास, सामाजिक न्याय या विभागांनी निर्णय कळवल्यास त्यानुसार भरती करण्यास तयार असल्याचंही उदय सामंत म्हणाले आहे. संस्थांच्या रोस्टर पद्धतीने निर्णय घेतला तर भरती प्रक्रिया लांबली जाऊ शकते, अशी शक्यताही सामंत यांनी व्यक्त केली.