नवेगाव-नागझिरा व्याघ्र प्रकल्प आजपासून सुरु

गोंदिया 26: कोरोना संसर्गाच्या पृष्ठभूमीवर बंद असलेले व्याघ्र प्रकल्प सुरु करण्यासाठी एनटीसीएने प्रधान मुख्य वनसंरक्षकांना स्थानिक पातळीवर निर्णय घेण्यास परवानगी दिली आहे. त्यानुषंगाने नवेगाव-नागझिरा व्याघ्र प्रकल्प आज, 26 जूनपासून सुरु होत आहे.

कोरोना विषाणू महामारीचा फटका देशातील व्याघ्र प्रकल्पात होणार्‍या पर्यटनालाही बसला. पर्यटकांसह वन्यप्राण्यांच्या सुरक्षेचे गांभीर्य लक्षात ठेवून व्याघ्र प्रकल्प बंद ठेवण्यात आले होते. कोरोनाच्या दुुसर्‍या लाटेत नवेगाव-नागझिरा व्याघ्र प्रकल्पही बंद ठेवण्यात आला होता. आता राज्यातील राज्यात सर्व सेवा व व्यवहार पूर्वपदावर येत आहे. अशावेळी पर्यटनही पूर्ववत सुरु करावे, अशी परवानगी एनटीसीए व राज्याच्या प्रधान मुख्य वनसंरक्षकांनी दिली असल्याने व्याघ्र प्रकल्पातील पर्यटनाचा मार्ग मोकळा झाला आहे.

राज्याचे प्रमुख मुख्य वनसंरक्षक (वन्यजीव) नितीन काकोडकर यांनी याबाबतचे पत्र 24 जून रोजी जारी केले असून व्याघ्र प्रकल्पात 30 जूनपर्यंत पर्यटन सुरु करण्याची परवानगी मिळाली आहे. यातंर्गत नवेगाव-नागझिरा व्याघ्र प्रकल्प 26 जूनपासून कोरोना दिशानिर्देशाचे काटेकोरपणे पालन करुन सुरु करण्यात येत असून पर्यटकांनी या दिशानिर्देशाचे पालन करुन पर्यटनाचा आनंद घेण्याचे आवाहन नवेगाव-नागझिरा व्याघ्र प्रकल्पाच्या क्षेत्र संचालकांनी केले आहे.

Share