पशुसंवर्धन विभागाच्या बेजबाबदार भूमिकेमुळे देवरी तालुक्यातील शेतकरी संतापले
◾️ऐन संक्रमणाच्या काळात पशुधन विकास अधिकारी आणि पशुसंवर्धन विभागाचे अधिकाऱ्यांच्या दालनाला लागले कुलूप
◾️घटसर्प, एकटांग्या, आंत्रविषार या गंभीर आजारांचा धोका वाढला
देवरी 23: अतिशय दुर्गम ,आदिवासी , डोंगराळ, नक्षल भाग म्हणून महाराष्ट्रात देवरी तालुका ओळखला जातो. याचा चांगलाच फायदा घेत येथील पशुसंवर्धन विभागाचा मनमर्जी कारभार समोर आला असून येथील अधिकाऱ्यांची बेजबाबदार कार्यावरणालीवर प्रश्नचिन्ह उपस्थित झालेला आहे.
महाराष्ट्राच्या शेवटच्या टोकावर असलेल्या देवरी तालुक्यात जास्तीत जास्त आदिवासी जमातीचे लोक वास्तव्य करतात. शेती व्यवसायासोबतच पशुपालनाचा जोडव्यवसाय ग्रामीण भागात प्रत्येक घरात बघावयास मिळते. याच व्यवसायावर येथील शेतकरी पशुधनाच्या साहाय्याने शेती , दुग्धव्यवसाय , शेळीपालन ,कुक्कुटपालन यावर उत्त्पन्न काढून आपली उपजीविका भागवीत असतो.
पशुधनाचे संगोपन आणि उत्तम आरोग्य सेवा मिळावे या उद्देशाने महाराष्ट्र शासनाने देवरी येथे कोट्यवधी रुपये खर्च करून पशुधन सर्वचिकित्सालय स्थापन केले असून देवरी येथे सहाय्यक पशुसंवर्धन आयुक्त तसेच पशुधन विकास अधिकारी यांची नियुक्ती केलेली आहे. नक्षलग्रस्त भागात सेवा देत असल्यामुळे शासनाकडून देण्यात येणाऱ्या सर्व भत्याचा हक्काने उचल करणाऱ्या संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांनी आपले कर्तव्य प्रामाणिकपणे न बजावता बेजाबदारपणाचा कळस गाठलेला दिसून येत आहे. त्याचा फटका तालुक्यातील सामान्य शेतकऱ्यावर बसला असून पशुधन संकटात सापडले आहे.
सध्या देवरी येथील पशु चिकीत्सालय परिचराच्या भरोस्यावर सोडले असून अधिकारी सुट्यांचा आनंदात व्यस्त असल्याचे निदर्शनास आले आहे. पशुधन संबंधित लसीकरणाबद्दल चिकित्सालयाच्या दर्शनी भागात सहाय्यक जनहित माहिती अधिकारी डॉ.पी .एम . जाधव यांचा भ्रमणध्वनी क्रमांक दिलेला असून त्यावर माध्यमाच्या प्रतिनिधींनी संपर्क केला असता “मी एक महिन्याच्या सुट्ट्यावर आहे मला यानंतर कॉल करू नका, तिथे जे आहे त्यांना विचारा” अशा शब्दात धमकावण्यात आले असल्याचे माध्यमाच्या प्रतिनिधींनी व्यक्त केले. यावरून शेतकऱ्यांच्या समस्या सोडविण्यासाठी संबंधित अधिकारी किती तत्पर आहेत याची प्रचिती येते.
सदर प्रकरणाची माहिती जाणून घेण्यासाठी सहाय्यक आयुक्त पशुसंवर्धन तसेच जनहित माहिती अधिकारी डॉ. एस.पी. गायगवळी यांच्याशी संपर्क केला असता त्यांनी प्रतिसाद दिला नसून, देवरी सारख्या दुर्गम भागाकडे संबंधित अधिकाऱ्यांनी पाठ फिरवून मनमर्जी कारभार चालविला आहे असे आरोप तालुक्यातील शेतकऱ्यांनी केलेले आहेत. मागच्या वर्षी लॅंपी आजारामुळे शेतकऱ्यांना मोठा नुकसान झालेला असून यावर्षी शेतकरी आपल्या पशुधनाबाबद चिंतेत आहे.
संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यावर कारवाई करण्याची मागणी तालुक्यातील शेतकऱ्यांनी स्थानिक जनप्रतिनिधीकडे केली आहे. जनप्रतिनिधींनी याकडे विशेष लक्ष देऊन तालुकयातील घटत्या पशुधनाकडे आणि पशु आरोग्य विषयक सोयी सुविधांकडे जनहितार्थ भूमिका दाखवावी.