सर्पदंशाने आईचे व मुलाचे निधन झालेल्या कुटुंबाला समाजसेविका डॉ. सविता बेदरकर यांची मदत…
तालुक्यातील शिक्षकांनी दिली 15 हजाराची मदत….
सालेकसा, (दि. 18 जून): तालुक्यातील ग्राम मुंडीपार येथे दि. 13 जून च्या रात्री विषारी सर्पदंशाने चावा घेतल्याने 11 वर्षीय मुलासह आईचे दुःखद निधन झाले होते. त्या दुर्दैवी घटनेची दखल सर्वच वृत्तपत्रानी घेतली होती. त्यांच्या पश्चात परिवारात आजारी पती, मुलगी गायत्री (18 वर्ष) व दिव्या (10) हे पोरके झाले आहेत. परिवार आर्थिक अडचणीत आला आहे.
जिल्हा परिषद प्राथमिक शाळा मुंडीपार येथे इयत्ता 7 वीत शिक्षण घेत असलेला दीपक दिलीप मोहारे व आई सतवंती दिलीप मोहारे यांचे सर्पदंशाने निधन झाल्याची वार्ता वाऱ्यासारखी समाज माध्यमातून सर्वत्र पसरली. दिलीप मोहारे हे लकवाग्रस्त असून ते कोणतेही काम करण्यास असमर्थ आहेत व नेहमी बिछान्यावर च असतात. परिवारात आता त्यांच्यासोबत दोन मुलीच राहिल्या आहेत. परिवाराची पालन पोषणकर्ती आईच होती. मोलमजुरी करून ती आपल्या संसाराचा गाडा हाकत होती. त्यामुळे आता मोहारे परिवार आर्थिक अडचणीत आला आहे.
सदर घटनेची माहिती मुंडीपार शाळेच्या शिक्षकांनी तालुका गटशिक्षणाधिकारी एस. जी. वाघमारे व शिक्षणाधिकारी राजकुमार हिवारे यांना दिली परिवाराला आर्थिक मदतीचे आवाहन केले. संवेदनशील मनाचे शिक्षणाधिकारी राजकुमार हिवारे यांनी देखील तालुक्यातील व जिल्ह्यातील शिक्षकांना सदर परिवारास मदत करण्याचे स्वतः समाज माध्यमातून आवाहन केले. व मदतीचा ओघ सुरू झाला. सोबतच अनाथांची माय म्हणून ओळख असलेल्या समाजसेविका डॉ. सविताताई बेदरकर यांच्याशी संपर्क करून सर्व माहिती दिली.
शिक्षणाधिकारी राजकुमार हिवारे यांच्या आवाहनाला तात्काळ प्रतिसाद देत आज समाजसेविका डॉ. सविताताई बेदरकर या आज(दि.18) ग्राम मुंडीपार येथे पोहोचल्या व मोहारे परिवाराची सांत्वना भेट घेऊन त्यांना 50 किलो तांदूळ, 10 किलो गहू, 1 पिंप खाद्यतेल, 2 किलो चणे, तूरडाळ, व इतर सर्व किराणा सामान भेट दिले. जिजाऊ ब्रिगेड च्या जयश्री पुंडकर यांनी 500 रु. रोख दिले.
तसेच मुख्याध्यापक, गटशिक्षणाधिकारी व शिक्षणाधिकारी यांच्या आवाहनाला तालुक्यातील शिक्षकांनी प्रतिसाद देत केलेल्या आर्थिक मदतीचा रु. 15000/- चा चेक गटशिक्षणाधिकारी एस. जे. वाघमारे सह मुख्याध्यापक टी. एफ. बरैय्या व शिक्षवृन्दानी कु. गीता दिलीप मोहारे हिला सुपूर्द केला. व अजून मदत जमा होत आहे ती लहान मुलगी कु. दिव्या हिच्या नावे सुपूर्द करण्याची हमी मुख्याध्यापक यांनी मोहारे परिवाराला दिली.
या प्रसंगी सालेकसा तालुक्याचे गटशिक्षणाधिकारी एस. जे. वाघमारे, गटसमन्वयक बी. डी. चौधरी, समाजसेविका सविताताई बेदरकर, महासत्ता डिजिटल न्यूज पोर्टल चे उपसंपादक वशिष्ठ खोब्रागडे, जिजाऊ ब्रिगेड आमगाव च्या जयश्री ताई पुंडकर, जिल्हा परिषद शाळेचे मुख्याध्यापक टी. एफ. बरैय्या, शा. व्यवस्थापन समिती अध्यक्ष प्रदीप मोहारे, उपाध्यक्ष लतेश उपराडे, शिक्षक व्ही. एस. मानकर,
जे. जी. बल्हारे, एम. एस. मोहारे, डी. बी. बोपचे, कु. एच. एम. अहमद हे उपस्थित होते.