राज्यात शैक्षणिक वर्षाला सुरुवात, कोरोनामुळे शाळा सुरु करणे शक्य नाही- वर्षा गायकवाड

मुंबई : राज्यात शैक्षणिक वर्षाला सुरुवात झाली आहे. ऑनलाईन माध्यमातून शाळा सुरु करण्यात आल्या आहेत. राज्यात कोरोनाचं संकट अद्याप कायम असल्यामुळे शाळा सुरु करता येणे शक्य नसल्याचं शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी म्हटलंय. त्याचबरोबर अभ्यासक्रमाची पुस्तकं Pdf स्वरुपात तयार करण्यात येत आहेत. त्याचबरोबर विद्यार्थ्यांना सह्याद्री वाहिनीद्वारे शिक्षण दिलं जाणार असल्याचंही गायकवाड म्हणाल्या. तसंच शुल्क आकारणीबाबत राज्य सरकार लवकरच निर्णय घेईल, अशी माहितीही गायकवाड यांनी दिली आहे.

शिक्षकांनी सोमवारी केलेल्या आंदोलनाची माहिती घेतली. आपत्ती व्यवस्थापन मंत्र्यांशी या शिक्षकांना रेल्वे प्रवासाला परवानगी देण्याबाबत चर्चा केली आहे, अशी माहितीही गायकवाड यांनी दिलीय. कोरोना प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर 10वी आणि 12वी परीक्षा रद्द करण्यात आल्या आहेत. 11 वी प्रवेशासाठी सीईटी परीक्षा घेण्याची तयारी झाली आहे. तर 12वी परीक्षा रद्द झाल्यानंतर निकाल लावण्यासाठी मूल्यांकन केलं जाणार असल्याचं त्यांनी यावेळी सांगितलं. त्याचबरोबर भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांच्या टीकेला उत्तर देताना कोणाच्या काळात पदोन्नती आरक्षण रद्द झालं हे पडळकरांनी पाहावं. पदोन्नती आरक्षण हे केंद्र सरकारच्या अखत्यारित असलेला निर्णय असल्याचं गायकवाड म्हणाल्या.

सुधारित मूल्यमापनाचं धोरण आणि निकालाची तारीख मंडळामार्फत लवकरच जाहीर करण्यात येईल, अशी माहिती वर्षा गायकवाड यांनी दिली आहे. कोरोना महामारीच्या काळात विद्यार्थ्यांची आरोग्य सुरक्षितता आणि मानसिक स्वास्थ्य यांनाच प्राधान्य देण्याची सरकारची भूमिका आहे. 12वीच्या परीक्षेचे महत्त्व लक्षात घेता मूल्यमापनाचे एकसमान सूत्र निश्चित करावं, अशी मागणी केंद्राकडे करण्यात आली होती. सर्व संबंधित घटकांशी केलेल्या चर्चेअंती सध्याचे वातावरण परीक्षेसाठी पोषक नसल्यानं परीक्षा रद्द करून पर्यायी मूल्यमापनाच्या आधारे निकाल घोषित करावा, असं महाराष्ट्र सरकारने केंद्राला यापूर्वीच सुचवलं होतं असं शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी सांगितलं.

Print Friendly, PDF & Email
Share