“कॉंग्रेसने सीएम पदाचा आग्रह धरावा, अन्यथा राज्य सरकारचा पाठिंबा काढून घ्यावा”

मुंबई: सध्या राजकीय वर्तुळात अनेक महत्त्वाच्या घडामोडी घडताना दिसत आहेत. एकिकडे विरोधी पक्षातील नेते आणि सत्ताधारी पक्षातील नेते यांच्यात आरोप प्रत्यारोपाची खेळी रंगली असतानाच दुसरीकडे महाविकास आघाडीमधील अंतर्गत कलह देखील चव्हाट्यावर येताना दिसत आहे. काँग्रेस नेते नाना पटोले यांनी मुख्यमंत्री पदाची इच्छा व्यक्त केल्यानं राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडालेली आहे.

नाना पटोले यांनी मुख्यमंत्रिपदाची इच्छा व्यक्त करताच अनेक नेत्यांनी त्यावर आपल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी देखील या मुद्यावर भाष्य केलं आहे. आठवले यांनी यासंबंधित एक ट्वीट केलं आहे.

फक्त इच्छा व्यक्त करून चालणार नाही तर काँग्रेसने सीएम पदाचा आग्रह धरला पाहिजे. काँग्रेसने पाठिंबा काढला तर महाविकास आघाडी सरकार पडेल. काँग्रेसने सीएम पदाचा आग्रह धरला पाहिजे. जर त्यांना सीएम पद दिले जात नसेल तर काँग्रेसने राज्य सरकारचा पाठिंबा काढावा. असे माझे नाना पटोले यांना आवाहन आहे, असं रामदास आठवले ट्वीट करत म्हणाले आहेत.

नाना पटोले यांनी नुकतंच विधानसभा निवडणुका काँग्रेस स्वबळावर लढेल. तसेच मुख्यमंत्री पदाचा चेहरा बनण्यास त्यांची तयारी असल्याची इच्छा व्यक्त केली होती. नाना पटोले यांनी मुख्यमंत्रिपदाची इच्छा व्यक्त करताच शिवसेना खासदार संजय राऊत यांनी उद्धव ठाकरेच 5 वर्ष मुख्यमंत्री राहतील, असं म्हणत शिवसेनेची भूमिका स्पष्ट केली आहे.

Share