दोन्ही लाटेत कोरोनामुक्त, तिसरी लाटही थोपविणार- सरपंच
?मुख्यमंत्र्यांशी संवादात सरपंचांनी दाखविला विश्वास
गोंदिया 13: शासनातर्फे ‘कोरोना मुक्त गाव’ हे आजार मुक्त गाव अभियान राबविण्यात येत आहे. या उपक्रमांतर्गत जिल्ह्यातील आमगाव तालुक्यातील करंजी आणि तिरोडा तालुक्यातील कुल्पा या आदिवासी बहुल गावांची आभासी संवादासाठी निवड करण्यात आली. यावेळी दोन्ही गावातील सरपंचांनी कोरोनाच्या दोन्ही लाटेत गाव कोरोनामुक्त ठेवल्याचे सांगून तिसर्या लाटेतही कोरोनाचा गावात शिरकाव होऊ देणार नसल्याचा विश्वास मुख्यमंत्री उद्धव ठाकरे दिला. कोरोना पहिल्या व दुसर्या लाटेत करंजी व कुल्पा या गावात एकही कोरोना बाधित आढळला नाही. त्यामुळे मुख्यमंत्र्यांशी थेट आभासी संवादासाठी या गावांची निवड करण्यात आली होती. थेट संवादात करंजीचे सरपंच हंसराज चुटे व कुल्पाचे सरपंच नाशिक धुर्वे सहभागी झाले.
या संवादात सरपंचांनी, कोरोनाच्या पहिल्या दुसर्या लाटेत केलेल्या विविध उपाययोजनांची माहिती दिली. त्यांनी सांगितले की, राज्यात टाळेबंदी लागल्यानंतर गावात बाहेरुन येणार्या मजुरांना 14 दिवस विलगीकरणात ठेवण्यात आले. गावात वेळोवेळी स्वच्छता, निर्जंतुकीकरणासह सामाजिक अंतर पाळणे, वेळोवेळी साबणाने हात स्वच्छ करणे, मास्कचा नियमीत वापर करण्याबाबत जनजागृतीसाठी गावातील मंदिरातील साउंड सर्व्हिसचा प्रभावी वापर करण्यात आला. तसेच कोव्हीड नियंत्रणासाठी वॉर्ड समितींचे गठण, दक्षता समितीची स्थापना, कुटुंब सर्व्हेक्षणासाठी वॉर्ड समिती, लसिकरण समिती, विलगीकरण व मदत कार्य समिती तथा आदिवासी खावटी समितींची स्थापना केल्याचे सांगितले.
जनजागृतीसाठी स्थानिक कर्मचारी, पदाधिकारी, नवयुवकांचे सामाजिक माध्यमांवर ग्रृप तयार करण्यात आले. दुसरी लाट थोपवियासाठी आशा, अंगणवाडी सेविका, शिक्षक, ग्रामसेवक यांच्या माध्यमातून लक्षणे असलेल्या गावकर्यांची कोव्हीड चाचणी करून वेळीच तपासणी माहीम सुध्दा राबविण्यात आली. त्यामुळे दोन्ही गावात एकही कोरोना बाधित आढळला नाही. आता संभाव्य तिसरी लाट थोपवून लावण्याची तयारी सुध्दा गावांनी केली असून त्यासाठी लसीकरण करण्यावर भर देण्यात येत आहे. आतापर्यंत 86 टक्क्यापेक्षा अधिक लसीकरण करण्यात आल्याचे सांगून गावांत शंभर टक्के लसीकरणाची ग्वाही सुध्दा याप्रसंगी सरपंचांनी दिली. यावेळी सरपंचांनी जिल्हा व तालुका अधिकार्यांनी वेळोवेळी केलेले मार्गदर्शन व सहकार्याबद्दल त्यांचेही आभार व्यक्त केले. दरम्यान, जिल्ह्यातील कामाचे कौतूक करून मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी कोरोनाच्या संभाव्य तिसर्या लाटेबाबत दक्षता घेण्याचे याप्रसंगी आवाहन केले.