वृत्तसंस्था / पाटणा : एका लग्नसमारंभात घडलेल्या घटनेने सगळेच हैराण झाले आहेत. यात माशाच्या आवडीच्या पीससाठी ११ लोकांमध्ये वाद सुरू झाला. वाद इतका वाढला की ते एकमेकांना मारहाण करू लागले. यात ११ जण गंभीर जखमी झाले. हे प्रकरण बिहारच्या गोपालगंजमधील भोरे क्षेत्रातील भटवलिया गावातील आहे. गुरुवारी रात्री याठिकाणी माशाचे डोके न मिळाल्याने वाद सुरू झाला आणि हा वाद मारहाणीत बदलला. पाहता पाहता वराती आणि मुलीच्या घरच्यांमध्ये मारहाण सुरू झाली. दोन्ही बाजूचे ११ लोक यात जखमी झाले. यानंतर उपचापासाठी त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले.
पोलिसांनी याप्रकरणी गुन्हाही दाखल करुन घेतला आहे. पीडित सुदामा गोंड नावाच्या एक व्यक्तीने असा आरोप केला, की त्यांचे नातेवाईक असलेल्या धन्नु गोंड यांच्याकडे मुलीची वरात आली होती. यात त्याच गावातील रहिवाशी असलेले हीरा गोंडदेखील आले होते. जेवण करताना त्यांनी जास्त पीस आणि माशाचे डोके देण्याची मागणी केली. मात्र, हे आणण्यासाठी उशीर झाला. त्यामुळे, हीरा गोंड यांनी मासे वाढणाऱ्या सुदामा गोंड याला मारहाण करण्यास सुरुवात केली. इतक्यात काठी आणि लोखंडी रॉड घेऊन अजय गोंड, राजा गोंड यांच्यासह पाच लोक त्याठिकाणी आले आणि सुदामा गोंड, त्यांचा मुलगा मुन्ना गोंड आणि सून रीना देवी यांना मारहाण करू लागले.
या घटनेत जखमी झालेल्या सर्वांना रुग्णालयात भर्ती करण्यात आले आहे. तर, याप्रकरणी पाच जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याआधीही ८ मे रोजी गोपालगंजच्या नरकटिया गावात चिकनसोबत लिट्टी न मिळाल्याने गोळीबार करण्यात आला होता. या भयंकर घटनेत राजेंद्र सिंह नावाच्या एक व्यक्तीचा मृत्यू झाला होता.








