अनलॉक : राज्य सरकारने जाहीर केली राज्यातील सर्व जिल्ह्यांची ताजी आकडेवारी,१४ जूनपासून नवे निर्बंध लागू होणार
वृत्तसंस्था / मुंबई : गेल्या आठवड्यापासून म्हणजेच ५ जूनपासून राज्यात टप्प्याटप्प्याने अनलॉकची प्रक्रिया सुरू करण्यात आली. यासाठी महाराष्ट्रातील सर्व जिल्हे आणि काही मोठ्या महानगरपालिका यांचे स्वतंत्र प्रशासकीय गट करून त्यांची विभागणी ५ टप्प्यांमध्ये करण्यात आली. त्यानुसार दर गुरुवारी जिल्हानिहाय नवी आकडेवारी जाहीर करून त्यानुसार प्रत्येक जिल्ह्याला किंवा स्वतंत्र प्रशासकीय गट ठरवण्यात आलेल्या महानगर पालिकांना स्थानिक पातळीवर निर्णय घेण्याचे आदेश देण्यात आले होते. त्यानुसार आज राज्य सरकारने राज्यातील सर्व जिल्ह्यांची ताजी आकडेवारी जाहीर केली असून त्यानुसार येत्या १४ जूनपासून म्हणजेच सोमवारपासून नवे निर्बंध लागू करण्याचे आदेश जारी केले आहेत. आकडेवारीमध्ये सर्वाधिक पॉझिटिव्हिटी रेट कोल्हापूरचा असल्याचे स्पष्ट झाले आहे.
राज्य सरकारने जाहीर केलेल्या टप्प्यांनुसार जिल्ह्यातील पॉझिटिव्हिटी रेट आणि एकूण उपलब्ध ऑक्सिजन बेडपैकी रुग्ण असलेल्या बेडचे प्रमाण या आधारावर जिल्ह्यांची विभागणी ५ गटांमध्ये करण्यात आली आहे. दर गुरुवारी यासंदर्भात आढाव घेण्याचा निर्णय घेण्यात आला. आजच्या आकडेवारीनुसार स्थानिक जिल्हा प्रशासन आपला जिल्हा किंवा त्यातील महानगर पालिका कोणत्या गटात नव्याने वर्ग करता येतील, किंवा आहे त्याच गटात कायम राहतील किंवा आहे त्याच गटात कायम ठेऊन निर्बंध कठोर होतील, याविषयीचा निर्णय घेईल. नव्याने घेण्यात आलेले निर्णय ठरल्याप्रमाणे १४ जूनपासून म्हणजेच सोमवारपासून त्या त्या जिल्ह्यात किंवा महानगर पालिका क्षेत्रामध्ये लागू करण्यात येतील.
जिल्हानिहाय पॉझिटिव्हिटी रेट (१० जून) :अहमदनगर – २.६३, अकोला – ५.३७, अमरावती – ४.३६, औरंगाबाद – ५.३५, बीड – ५.२२, भंडारा – १.२२, बुलढाणा – २.३७, चंद्रपूर – ०.८७, धुळे – १.६, गडचिरोली – ५.५५, गोंदिया – ०.८३, हिंगोली – १.२०, जळगाव – १.८२, जालना – १.४४, कोल्हापूर – १५.८५, लातूर – २.४३, मुंबई शहर आणि उपनगर – ४.४०, नागपूर – ३.१३, नांदेड – १.१९, नंदुरबार – २.०६, नाशिक – ७.१२, उस्मानाबाद – ५.१६, पालघर – ४.४३, परभणी – २.३०, पुणे – ११.११, रायगड – १३.३३, रत्नागिरी – १४.१२, सांगली – ६.८९, सातारा – ११.३०, सिंधुदुर्ग – ११.८९, सोलापूर – ३.४३, ठाणे – ५.९२
वर्धा – २.०५, वाशिम – २.२५, यवतमाळ – २.९१
पॉझिटिव्हिटी रेटची जिल्हानिहाय आकडेवारी
काय आहेत निकष?
त्या त्या जिल्ह्यामध्ये किंवा महानगरपालिका क्षेत्रामध्ये रुग्णांचा पॉझिटिव्हिटी रेट आणि उपलब्ध ऑक्सिजन बेडची तसेच ऑक्युपाईड म्हणजेच सध्या रुग्ण असलेल्या बेडची संख्या किती आहे, त्यावरून ५ गटांमध्ये विभागणी केली आहे. त्यानुसार…
पहिला गट – ५ टक्क्यांपेक्षा कमी पॉझिटिव्हिटी रेट आणि २५ टक्क्यांपेक्षा कमी ऑक्सिजन बेड ऑक्युपन्सी
दुसरा गट – ५ टक्क्यांपेक्षा कमी पॉझिटिव्हिटी रेट आणि २५ ते ४० टक्के ऑक्सिजन बेड ऑक्युपन्सी
तिसरा गट – ५ ते १० टक्के पॉझिटिव्हिटी रेट आणि ४० टक्क्यांपेक्षा जास्त ऑक्सिजन बेड ऑक्युपन्सी
चौथा गट – १० ते २० टक्के पॉझिटिव्हिटी रेट आणि ६० टक्क्यांपेक्षा जास्त ऑक्सिजन बेड ऑक्युपन्सी
पाचवा गट – २० टक्क्यांपेक्षा जास्त पॉझिटिव्हिटी रेट आणि ७५ टक्क्यांपेक्षा जास्त ऑक्सिजन बेड ऑक्युपन्सी
दरम्यान, राज्य सरकारने ठरवलेल्या निकषांनुसार पॉझिटिव्हिटी रेटप्रमाणेच ऑक्सिजन बेड किती प्रमाणात भरलेले आहेत, त्यानुसार देखील जिल्ह्यांची वर्गवारी कोणत्या टप्प्यात करायची किंवा कोणते निर्बंध जिल्ह्यात लागू करायचे, याचा निर्णय स्थानिक प्रशासन घेणार आहे.