प्रसिद्ध निवडणूक रणनितीकार प्रशांत किशोर शरद पवारांच्या भेटीला; राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण
मुंबई – राष्ट्रवादी पक्ष भाजपसोबत जाईल, अशी चर्चा काही दिवसांपुर्वी चालू होती. मात्र, राष्ट्रवादीच्या सर्व प्रमुख नेत्यांनी वर्धापन दिनाच्या निमित्ताने भाजपवर कडाडून टीका केली. त्याचबरोबर या वर्धापन दिनी खुद्द शरद पवारांनी शिवसेनेचं कौतुक केल्यानं या चर्चा थांबल्या होत्या. परंतू आता प्रसिद्ध निवडणूक रणनितीकार प्रशांत किशोर हे शरद पवारांच्या भेटीला आल्यानं पुन्हा राजकीय चर्चेला उधाण आलं आहे.
पश्चिम बंगालमध्ये ममता बँनर्जी यांना दमदार विजय मिळवून देणारे राजकीय रणनितीकार प्रशांत किशोर सिल्व्हर ओकवर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेणार आहे. शुक्रवारी सकाळी 11 वाजता प्रशांत किशोर शरद पवार यांच्या मुंबईतील सिल्व्हर ओक निवासस्थानी भेट घेणार आहेत. त्यांच्या या अचानक भेटीमुळे आता राजकिय वर्तुळात चर्चेला उधाण आलं आहे.
आगामी काळात महाविकासआघाडी लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुका एकत्र लढवेल, असं शरद पवार यांनी म्हटलं होतं. तर येत्या काही काळात मुंबई महापालिकेच्या निवडणूका लागणार आहेत. या मुंबई महापालिकेच्या निवडणूकीत महाविकास आघाडी शिवसेनेसोबत निवडणूक लढवेल, अशी शक्यता काही राज्यातील नेत्यांनी वर्तवली आहे. मुंबई महापालिका ही शिवसेनेसाठी स्वाभिमानाचा विषय असल्यानं शिवसेना पुर्ण तयारीने या निवडणुकीत उतरणार आहे. त्यासाठी देखील ही भेट महत्वाची मानली जात आहे.
दरम्यान, ‘आयपॅक’ ही प्रशांत किशोर यांची निवडणूक संघटना/कंपनी आहे. राजकीय पक्षाकडून पैसे घेऊन राजकीय पक्षाच्या निवडणूकीसाठीची जबाबदारी ही संघटना घेते. तर एखाद्या नेत्याचा दौरा आयोजित करण्याचं काम देखील प्रशांत किशोर करतात. 2014 च्या लोकसभा निवडणुकीत प्रशांत किशोर यांनी पंतप्रधान मोदींचे सर्व कार्यक्रम आयोजित केले होते. तर आदित्य ठाकरे यांचे अनेक दौरे त्यांनी आयोजित केले आहेत.