लहान मुलांच्या करोना चाचणीसाठी आता ‘लॉलीपॉप टेस्टींग किट’ : १५ मिनिटांत मिळणार रिपोर्ट
नवी दिल्ली : मागील काही दिवसांपासून करोनाची दुसरी लाट थैमान घालत आहे. पहिल्या लाटेत ज्येष्ठ नागरिक आणि दुसऱ्या लाटेत तरुणांना सर्वाधिक बाधा झाली होती. आता तिसऱी लाट लहान मुलांसाठी घातक असल्याचे बोलले जात आहे. त्यातच आता वैज्ञानिकांनी लहान मुलांची करोना चाचणी करण्यासाठी एक अनोखी टेस्टींग किट विकसित केली आहे.
लहान मुलांची करोनाची चाचणी करण्यासाठी नवीन टेस्टींग किट तयार करण्यात आली आहे. या किटला ‘लॉलीपॉप टेस्टींग किट’ असं नाव देण्यात आलं आहे. यामध्ये एका कॉटन स्वॅबला तोंडात ठेऊन लॉलीपॉपप्रमाणे चोखायचं, त्यामुळे लहान मुलांच्या स्वॅबचा नमूना किटच्या स्टीकवर येतो. त्यानंतर याला सॅम्पल म्हणून तपासणीसाठी पाठविण्यात येत.
ऑस्ट्रियात किंडरगार्टन येथील मुलांवर या किटचा वापर करण्यात आला आहे. येथील सरकारने मोठ्या प्रमाणात मुलांच्या टेस्टींगसाठी याचा वापर सुरू केला आहे. मुलांची करोना चाचणी करण्यासाठी लॉलीपॉप टेस्टींग किट प्रभावी ठरत आहे. मुलांच्या नाकातून आणि घशातून स्वॅब घेण्यासाठी अडचण येते, अशा मुलांसाठी ही किट फायदेशीर ठरत आहे. ऑस्ट्रियात आता ३५ हजार किट तयार करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
ऑस्ट्रियातील बर्गेनलँडमधील मुलांची आठवड्यातून तीनवेळा विनामुल्य करोना चाचणी करण्यात येणार आहे. या टेस्टसाठी मुलांना ९० सेकंद कॉटन स्वॅबला लॉलीपॉप प्रमाणे चोखायचं असतं. त्यानंतर त्याला एका कंटेनरमध्ये बुडवलं जातं. त्यानंतर १५ मिनिटांत करोना चाचणीचा अहवाल प्राप्त होतो. जर्मनीतील एका भागात या टेस्ट किट वापराला परवानगी देण्यात आली आहे.