शेतकऱ्यांचे रब्बीचे धान्य आता चक्क शाळेत
?शेतकऱ्यांच्या धान खरेदीचा मार्ग मोकळा
?गोंदिया जिल्हातील 182 शाळेला बनविले गोडाऊन
?जिल्हाधिकारी राजेश खवले यांचे प्रादेशिक व्यवस्थापक भंडारा आदिवासी विकास महामंडळ यांना आदेश
डॉ. सुजित टेटे
गोंदिया 5: गोंदिया जिल्हा भाताचा जिल्हा म्हणून देशात ओळख आहे. या जिल्हातील नागरिक मुख्यतः मोलमजुरी, शेती आणि धान पिकावर आपले उदरनिर्वाह करतात. आदिवासी आणि नक्षलग्रस्त भाग म्हणून शासनाने अधिकारी आणि कर्मचारी वर्गाला पगारात चांगलेच भत्ते जोडलेले असल्यामुळे या जिल्हात काम करणारे अधिकारी आणि कर्मचारी नेहमीच आनंदात असतात हे खरे! परंतु येथील शेतकऱ्याची दयनीय अवस्था ही शोकांतिका आहे.
आदिवासी आणि नक्षलभाग म्हणून याक्षेत्रातील आरोग्य विषयक तसेच भौतिक सोयी सुविधाकडे नेहमीच दुर्लक्ष होत असून त्याचा विपरीत परिणाम या क्षेत्रातील आदिवासी आणि शेतकरी वर्गावर होत असतो. धान पीक हे या क्षेत्रातील पारंपारिक उत्पादन असल्यामुळे खरीप आणि रब्बी हंगामात मोठयाप्रमाणात धानाचे उत्पादन करण्यात येते परंतु धानाचे साठवण करण्यासाठी शासनाच्या पुरेशा सोयी सुविधा नसल्यामुळे यावर्षी शासनाने धान खरेदीला पूर्ण विराम दिल्यामुळे लॉकडाऊनच्या काळात येथील शेतकऱ्यांना पुन्हा मोठा धक्का बसला आणि त्यांच्यावर आर्थिक आणि मानसिक ताण निर्माण झाला होता.
या समस्येचे निराकरण करण्यासाठी स्थानिक लोकप्रतिनिधींनी शासन आणि प्रशासनाकडे धाव घेऊन शेतकऱ्यांचे संकट दूर करण्याचे साकडे घातले आणि त्यातून परिसरातील धान खरेदी आणि साठवणूक करण्यासाठी लॉकडाऊन काळात बंद असलेल्या शाळांमध्ये गोडाउन करून धान खरेदीचा मार्ग मोकळा झाला.
नेहमीच नैसर्गिक आणि इतर संकटाचा सामना करणाऱ्या शेतकऱ्यांनी पिकविलेल्या धानाची खरेदी होणार नाही तर शेतकऱ्यांनी काय करावे असे अनेक प्रश्न उपस्थित होतात . प्राप्त माहितीनुसार मागील हंगामातील हजारो शेतकऱ्यांचे धानाचे बिल अजूनही मिळाले नाही आणि शासनाने मंजूर केलेला बोनस शेतकऱ्यांना मिळालेला नाही त्यामुळे शेतकऱ्यांनी पिकवायचे काय आणि खायचे काय असे प्रश्न अजूनही निरुत्तरित आहेत.
यावर उपाय म्हणून नुकतेच जिल्हाधिकारी पदावर रुजू झालेले राजेश खवले यांनी आदेश काढले असून गोंदिया जिल्हातील 182 शाळा ताब्यात घेऊन क्षमतेनुसार त्यामध्ये धानाची साठवणूक करण्याचे आदेश दिले आहेत . यामध्ये जिल्यातील देवरी, सालेकसा आणि अर्जुनी मोर तालुक्यातील शाळांची यादी जाहीर करण्यात आली आहे.
राज्य पोलिस दल हादरलं ! पोलीस निरीक्षकाकडून महिला पोलीस शिपायावर बलात्कार, प्रचंड खळबळ