महाविकास आघाडी असो नसो पण राष्ट्रवादीच्या ‘या’ आमदाराला पाडणार’; संजय राऊत आक्रमक
पुणे : खेड पंचायत समितीच्या सदस्यांच्या पळवापळवीवरून शिवसेनेचे नेते आणि खासदार संजय राऊत यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. पंचायत समितीच्या या बंडखोरीमागे दिलीप मोहितेंचा हात असल्याचीही राजकीय वर्तुळात चर्चा आहे. याच पार्श्वभूमीवर संजय राऊत यांनी राष्ट्रवादीचे आमदार दिलीप मोहिते पाटील यांच्यावर निशाणा साधला आहे.
महाराष्ट्रात महाविकास आघाडीचा कारभार योग्यरित्या सुरु असताना खेडमध्ये जे घाणेरडं राजकारण सुरु आहे, ते आघाडीला शोभा देणारं नाही. जे खेडला घडलं त्याचं खापर आम्ही शरद पवार, अजित पवार, सुप्रिया सुळे यांच्यावर फोडणार नाही. त्यांचे आमचे सरकारमधील संबंध चांगले आहेत, चांगले राहतील. पण आमदार दिलीप मोहिते पाटील यांचा बंदोबस्त पुण्याचे पालकमंत्री अजित पवार यांना करावा, नाहीतर शिवसेनेकडे हा विषय सोपवावा, असं संजय राऊत म्हणाले.
खेड पंचायत समिचीचा विषय आमच्यासाठी संपलाय. आम्हीही माणसं फोडू शकतो. पण आम्ही नियमांनी बांधल्यामुळे आम्ही ते करणार नाही. बाळासाहेब ठाकरेंप्रमाणे आमची शरद पवारांवरही श्रद्धा आहे. आम्ही त्यांच्यापर्यंत आधी जाऊ, त्यानंतर काय करायचं हे आम्ही पाहू. मोहिते यांची वागणूक अशीच असेल तर पुढील विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडी असो की नसो, इथे मात्र शिवसेनेचा उमेदवार असेल आणि आताचे दिलीप मोहिते यांना पाडून शिवसेनेचे आमदार निवडून येईल, असंही संजय राऊत यांनी म्हटलं आहे.
दरम्यान, खेड पंचायत समितीचे शिवसेनेचे सभापती भगवान पोखरकर यांच्या विरोधात सर्वपक्षीय 14 पैकी 11 जणांच्या वतीने अविश्वास ठराव दाखल केला आहे. खेड पंचायत समितीत शिवसेनेची सत्ता आहे. त्यांचे 8 सदस्य आहेत. तर कॉंग्रेस, भाजप असा प्रत्येकी एक मिळून 14 पैकी 10 सदस्यांचे बलाबल आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे 4 सदस्य आहेत. सभापतीपद सर्वसाधारण वर्गासाठी आहे. परंतु त्यातच सदस्यांनी सभापती भगवान पोखरकर यांच्या विरोधात बंड केलं आहे.