महाराष्ट्रातील अनलॉकवरून महाराष्ट्र सरकारचा घुमजाव; अनलॉकच्या श्रेयावरून राजकारण ?

मुंबई : महाराष्ट्रात कोरोना रुग्णसंख्या आटोक्यात आल्याने अनलॉक होणार असल्याचं मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी आज पत्रकार परिषद घेऊन स्पष्ट केलं. तसेच उद्यापासून महाराष्ट्रातील जिल्हे 5 टप्प्यात अनलॉक होतील, असं देखील त्यांनी सांगितलं. दरम्यान, यासंबंधी आता मोठा संभ्रम निर्माण झाल्याचं चित्र पाहायला मिळत आहे.

राज्यातील आपत्ती व्यवस्थापन विभागाची आज बैठक पार पडली त्या बैठकीनंतर मंत्री विजय वडेट्टीवार यांनी उद्यापासून महाराष्ट्रातील 18 जिल्हे पूर्णपणे उघडणार असल्याचं सांगितलं. त्यानंतर नाशिकमध्ये व्यापाऱ्यांनी फटाके देखील वाजवुन या निर्णयाचं स्वागत केलं. परंतु, अवघ्या एका तासातच मुख्यमंत्री कार्यालयाकडून याबाबत स्पष्टीकरण देण्यात आले की, राज्यातील कोणत्याही भागातील निर्बंध हटवण्यात आले नाही. तसेच नव्या नियमांचा प्रस्ताव हा विचाराधीन आहे.

मुख्यमंत्री कार्यालयाकडून आलेल्या स्पष्टीकरणानंतर ठाकरे सरकारमध्ये समन्वय नसल्याचं स्पष्टपणे दिसून येत आहे. यावरून विरोधी पक्षाने ठाकरे सरकारला चांगलंच सुनावलं आहे. दरम्यान, भाजप नेते अतुल भातखळकर यांनी ‘हे सरकार नसून सर्कस आहे’, अशा शब्दात ठाकरे सरकारवर टीका केली आहे.

मुख्यमंत्री कार्यालयाने दिलेल्या स्पष्टीकरणानुसार प्रशासकीय घटकांकडून पूर्ण आढावा घेऊन नियमांच्या अंमलबजावणीचा विचार केला जाईल, असं सांगण्यात आलं आहे. तसेच अधिकृत निर्णय अद्याप घेण्यात आलेला नाही, हे देखील बोलण्यात आलंय. त्यानंतर विजय वडेट्टीवार यांनी नागपूरमध्ये पोहोचल्यानंतर अंतिम निर्णय हा मुख्यमंत्रीच घेतील, असं स्पष्टीकरण देत यू-टर्न घेतला आहे. त्यामुळे महाराष्ट्रात अनलॉकच्या श्रेयावरून चढाओढ सुरू आहे का? असा प्रश्न उपस्थित होत आहे.

Share

👇समाचार सुनने के लिए यहां क्लिक करें

और पढ़ें