“हे सरकार नाही सर्कस आहे”; अनलॉकच्या संभ्रमावरून ठाकरे सरकारवर बोचरी टीका

मुंबई : महाराष्ट्रातील रुग्णसंख्या कमी झाल्यामुळे महाराष्ट्रात अनलाॅक करण्यात येणार असल्याचं मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी आज पत्रकार परिषद घेऊन स्पष्ट केलं. आज आपत्ती व्यवस्थापन विभागाची बैठक झाली आणि त्या बैठकीत पाच टप्प्यांमध्ये महाराष्ट्र अनलॉक करण्यात येणार असल्याचा निर्णय घेण्यात आल्याचं मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी सांगितलं.

दरम्यान, त्यासंबंधी आता अनेक संभ्रम निर्माण होताना पाहायला मिळत आहेत. मुख्यमंत्री कार्यालयाकडून विजय वडेट्टीवार यांनी दिलेल्या माहितीची कोणत्याही प्रकारची पुष्टी करण्यात आलेली नाही. तसेच हा प्रस्ताव विचाराधीन असल्याचं सांगण्यात येत आहे. त्यामुळे जनतेमध्ये मोठ्याप्रमाणात संभ्रम निर्माण झाला आहे.

यावरूनच भाजपा नेते अतुल भातखळकर यांनी ठाकरे सरकारवर सडकून टीका करताना ‘हे सरकार नाही तर सर्कस आहे’, अशा शब्दात बोलून दाखवलं आहे. त्याबरोबरच विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी देखील सरकारमध्ये समन्वय नसून कोणीही येऊन काही सांगून जातं आणि यामुळे जनतेचं नुकसान होतं. अशा प्रकारची प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.

भाजपचे नेते अतुल भातखळकर यांनी हे संपूर्ण प्रकरण अत्यंत संतापजनक असून नागरिकांना याचा नाहक त्रास होत आहे. तसेच सरकारमधील समन्वय नसल्याचं यामुळे स्पष्टपणे दिसून येत आहे, असं देखील बोलून दाखवलं.

Print Friendly, PDF & Email
Share