“गरज पडल्यास दररोज ऑनलाईन मिटिंग घ्या; पण 12वीचा निकाल 2 आठवड्यामध्ये जाहीर करा”
नवी दिल्ली | सर्वोच्च न्यायालयात 12वीच्या परीक्षा रद्द करण्यासंबंधी अॅड. ममता शर्मा यांच्या याचिकेवर सुनावणी पार पडली. सर्वोच्च न्यायालयात सुनावणी दरम्यान केंद्र सरकारला 2 आठवड्यामध्ये बारावीचा निकाल कसा लावणार हे सांगा, असा अल्टिमेटम दिला आहे. बारावीच्या विद्यार्थ्यांच्या पुढील शिक्षणासाठी देशातील आणि परदेशातील अभ्यासक्रमांचे प्रवेश महत्वाचे आहेत. तुम्ही तातडीनं निर्णय घ्या, गरज पडल्यास दररोज ऑनलाईन मिटिंग घ्या पण 2 आठवड्यामध्ये निर्णय जाहीर करा, असं सर्वोच्च न्यायालयानं सांगितलं आहे.
सर्वोच्च न्यायालयात केंद्र सरकारकडून अॅटर्नी जनरल के.के. वेणुगोपाल यांनी ममता शर्मा यांची याचिका रद्द करण्याची मागणी केली. ममता शर्मा यांच्या याचिकेतील मागणी मंजूर झाली आहे, त्यांची याचिका रद्द करावी अशी मागणी केंद्राकडून करण्यात आली. मात्र, सर्वोच्च न्यायालयानं 12वीचा निकाल कसा लावणार हे सांगा, अशी विचारणा केंद्राला केली. त्यावर निकाल कसा जाहीर करणार हे सीबीएसई ठरवेल, असं केंद्राकडून सांगण्यात आलं आहे.
बारावीच्या परीक्षांचा निकाल जाहीर करण्यासाठी निकष ठरवण्यात आले असतील तर न्यायालयापुढं सादर करा, याचिका निकाली काढू असं सर्वोच्च न्यायालयानं म्हटलं आहे. यावर आयसीएसईच्या वकिलांनी 4 आठवड्यांची वेळ मागितली. सर्वोच्च न्यायालयानं केंद्राची बाजू आणि आयसीएसईची बाजू ऐकून घेत 2 आठवड्यांची मुदत दिली. तुमची इच्छा असेल तर हे एका रात्रीत करु शकता. मात्र, 2 आठवड्यामध्ये निकालाचे निकष जाहीर करा. वेळ वाढवून देण्यासाठी युक्तिवाद करु नका, असं न्यायमूर्तींनी सांगितलं. न्यायमूर्ती माहेश्वरी यांनी सांगितलं की, गेल्या आठवड्यात त्यांच्याकडे निर्णय घेण्यास वेळ होता, आता 2 आठवड्यामध्ये निकष जाहीर करा असं सांगितलं आहे.
दरम्यान, अजून काही राज्य परीक्षा बोर्डांचा निर्णय झालेला नाही. राज्य बोर्डांनी सुद्धा 12वी परीक्षांबाबत एकसारखा निर्णय घ्यावा असं म्हटलं आहे. यावर विद्यार्थ्यांच्या हिताचा निर्णय घेतला जाईल, ते सीबीएसईचे असोत, आयसीएसईचे असोत किंवा राज्य बोर्डांचं असोत, असं सर्वोच्च न्यायालयानं सांगितलं आहे.