महाराष्ट्राच्या ‘या’ शहरातील पालिकेची 11 कोविड सेंटर होणार बंद; रुग्णसंख्या घटल्याने प्रशासनाचा निर्णय

नवी मुंबई : महाराष्ट्रात गेल्या काही दिवसांपासून कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढतच होती. पण हळूहळू आता ही रुग्णसंख्या आटोक्यात येत असल्याचं दिलासादायक चित्र पाहायला मिळत आहे. त्याच पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातील विविध भागांमध्ये लॉकडाऊनमधून शिथिलता देण्यात आली आहे.

रुग्णसंख्या घटल्याने नवी मुंबई महापालिकेने पालिकेची 11 कोरोना सेंटर बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. नवी मुंबईतील कोरोना रुग्णसंख्या झपाट्याने कमी व्हायला गेल्या काही दिवसांपासून सुरुवात झाली. तसेच सध्या सक्रिय रुग्णसंख्या देखील कमी झाली आहे. त्याच पार्श्वभूमीवर वाशी येथील सिडको एक्जीबिशन सेंटर मधील कोरोना सेंटर सुरू राहणार असल्याची माहिती अतिरिक्त आयुक्त संजय काकडे यांनी दिली आहे.

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत संपूर्ण महाराष्ट्रातच रुग्णांची संख्या झपाट्याने वाढली आणि परिणामी आरोग्य यंत्रणेवर मोठ्या प्रमाणात ताण आल्याचं भयावह चित्र पाहायला मिळालं. त्यातच आता रुग्णसंख्या आटोक्यात येत असल्याने दिलासादायक वातावरण पाहायला मिळत आहे.

येत्या तीन दिवसांमध्ये नवी मुंबई महापालिका क्षेत्रातील कोरोना सेंटर बंद करण्यात येणार असून फक्त एकच केंद्र सुरू राहणार असल्याची माहिती नवी मुंबई पालिकेचे अतिरिक्त आयुक्त संजय काकडे यांनी देत कोरोना रुग्णसंख्या घटल्याने हा निर्णय घेतला असल्याचं सांगितलं आहे.

Share