ACB Trap : लाच म्हणून घेतली ‘दारु-मटणा’ची पार्टी; ताव मारत असतानाच अ‍ॅन्टी करप्शननं रंगेहाथ पकडलं..!

बुलढाणा – प्लॉटची सातबारावर नोंदणी करुन फेरफारची नक्कल देण्यासाठी १० हजार रुपये घेतल्यानंतरही मंडळ अधिकारी व तलाठ्याने दारु व मटणाची पार्टी मागितली. दारु व मटणावर ताव मारत असतानाच लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने(ACB) छापा टाकून दोघांना रंगेहाथ पकडले आणि दोन मद्याच्या बाटल्याही जप्त केल्या.

मंडळ अधिकारी विलास साहेबराव खेडेकर (रा. लाखनवाडी) आणि शिर्ला नेमाणे येथील तलाठी बाबुराव उखर्डा मोरे (रा. किन्ही महादेव, खामगाव) अशी अटक केलेल्या दोघांची नावे आहेत. खामगाव तालुक्यातील शिर्ला नेमाणे येथील एका ४२ वर्षाच्या व्यक्तीने त्यांच्या भावाच्या नावावर प्लॉट घेतला होता. त्याची सातबारा नोंद घेऊन फेरफार नक्कल देण्यासाठी तलाठी बाबुराव मोरे व मंडळ अधिकारी विलास खेडेकर यांनी त्यांच्याकडून १० हजार रुपयांची लाच घेतली होती. त्यानंतर ते दारु व मटणाची पार्टी मारत होते. पार्टीसाठी त्यांचा आग्रह सुरु होता. त्यामुळे त्रस्त झालेल्या तक्रारदाराने लाच लुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दिली. त्यानुसार पोलिसांनी सापळा रचला.

खामगाव तालुक्यातील पिंप्री धनगर येथील प्रल्हाद चव्हाण यांच्या शेतातील झोपडीसमोर शुक्रवारी सायंकाळी पार्टीचे आयोजन करण्यात आले. मंडल अधिकारी आणि तलाठी हेही आले. त्यांनी दारु पिऊन मटणावर ताव मारण्यास सुरुवात केल्यावर लाच लुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस उपअधीक्षक संजय चौधरी पोलीस निरीक्षक सचिन इंगळे व त्यांच्या सहकार्‍यांनी तेथे छापा टाकला. दोघांनाही ताब्यात घेण्यात आले. त्यासोबत मद्याच्या दोन बाटल्याही जप्त करण्यात आल्या. कारवाईदरम्यान नाशवंत असलेले खाद्यपदार्थ पंचासमक्ष नष्ट करण्यात आले.

Print Friendly, PDF & Email
Share