कोरोनाचं हॉटस्पॉट ठरलेल्या ‘या’ शहरातील नव्या कोरोनाबाधितांची संख्या 500च्या खाली
नागपूर | गेल्या वर्षीपासून कोरोनाने संपूर्ण देशभरात हाहाकार माजवला आहे. कोरोनाची दुसरी लाट आल्यापासून महाराष्ट्रात देशातील सर्वाधिक रुग्णसंख्या आढळून येत असल्याचं चित्र पाहायला मिळालं. त्याचबरोबर पहिल्या लाटेपासूनच कोरोनाचं हॉटस्पॉट बनलेल्या नागपूरमध्ये कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत होती.
दरम्यान, गेल्या काही दिवसांपासून नागपूरमधील नवीन कोरोनाबाधितांपेक्षा कोरोनामुक्त होणाऱ्यांची संख्या वाढल्याचं दिलासादायक चित्र पाहायला मिळत आहे. आज दिवसभरात नागपूरमध्ये एकूण 2 हजार 003 जणांनी कोरोनावर मात केली आहे.
नागपूरमध्ये आज दिवसभरात अवघ्या 482 नव्या कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. तसेच 28 जणांना कोरोनामुळे आपला प्राण गमवावा लागला आहे. आतापर्यंत नागपूरमध्ये एकूण 4 लाख 71 हजार 541 कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. तसेच आतापर्यंत 4 लाख 50 हजार 360 जण कोरोनामुक्त होऊन आपल्या घरी परतले आहेत. एकेकाळी कोरोनाचं हाॅटस्पाॅट बनलेल्या नागपूरमधुन आता दिलासादायक चित्र पाहायला मिळत आहे.
नागपूरमध्ये आतापर्यंत 8 हजार 797 जणांचा कोरोनामुळे दुर्दैवी मृत्यू झाला आहे. महाराष्ट्रात रुग्णसंख्या वाढल्यामुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी 1 जूनपर्यंत लॉकडाऊन घोषित केला आहे. लॉकडाऊनचा सकारात्मक परिणाम हळूहळू महाराष्ट्रातील विविध भागांमधून पाहायला मिळत आहे. विविध भागांमधील कोरोनाबाधितांची संख्या कमी होत असल्याचं दिलासादायक चित्र पाहायला मिळत आहे.