ब्लॅक फंगस आजारावरील उपचाराबाबत राज्य सरकारचं उच्च न्यायालयात ‘हे’ मोठं स्पष्टीकरण
औरंगाबाद : महाराष्ट्रामध्ये कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने हाहाकार माजवला असतानाच आता ब्लॅक फंगस नावाच्या नव्या आजाराने डोकं वर काढलं आहे. ब्लॅक फंगसचे महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांमध्ये मोठ्या प्रमाणात रुग्ण आढळून येत असताना पाहायला मिळत आहे.
मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठामध्ये कोरोना साथरोगावर सूमोटो याचिका दाखल करण्यात आलेली आहे. औरंगाबाद खंडपीठाने ब्लॅक फंगस या आजाराच्या उपचाराबाबतही राज्य सरकारला विचारणा केली होती. यावेळी राज्य सरकारने महाराष्ट्रातील तब्बल 130 रुग्णालयात ब्लॅक फंगस आजारावर मोफत उपचार मिळणार असल्याचं स्पष्टीकरण दिलं आहे.
दरम्यान, महाराष्ट्रातील 130 रुग्णालयांमध्ये महात्मा फुले जन आरोग्य योजनेतून ब्लॅक फंगस या आजाराने त्रस्त असलेल्या रुग्णांवर मोफत उपचार होणार आहेत. राज्य सरकारने स्पष्टीकरण दिल्यानंतर आता ब्लॅक फंगस आजारावरील उपचार पूर्णपणे मोफत करण्यात येणार असल्याचं स्पष्ट झालं आहे.
मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठामध्ये महाराष्ट्र सरकारने ब्लॅक फंगस या आजारावरील उपचाराबाबत मोठं स्पष्टीकरण दिल्याने या रोगाने त्रस्त असलेल्या नागरिकांना काही प्रमाणात दिलासा मिळाला आहे.