दहावी परीक्षेच्या निर्णयाबाबत राज्य सरकार आपल्या भूमिकेवर ठाम; लवकरच अंतिम निर्णय येण्याची शक्यता
मुंबई | महाराष्ट्रात कोरोनाची गंभीर परिस्थिती लक्षात घेता 20 एप्रिल रोजी शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी दहावीच्या परीक्षा रद्द करण्यात येणार असल्याची घोषणा केली होती. राज्य सरकारने घेतलेल्या या निर्णयाविरोधात पुण्यातील प्राध्यापक धनंजय कुलकर्णी यांनी मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली. दरम्यान, दहावीच्या परीक्षेवरून सध्या महाराष्ट्रात चांगलंच वादंग पेटल्याचं चित्र पाहायला मिळत आहे.
रविवारी शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी माध्यमांच्या प्रतिनिधींशी संवाद साधला. यावेळी कोरोनाची तिसरी लाट आणि विद्यार्थी व शिक्षकांच्या सुरक्षेचा विचार करून यंदाच्या वर्षी दहावीच्या परीक्षा घेता येणार नाही, असं स्पष्ट केलं होतं. तसेच मुंबई उच्च न्यायालयात दाखल झालेल्या याचिकेवर आम्ही आमची भूमिका मांडणार आहोत, असं देखील त्यांनी बोलून दाखवलं.
दरम्यान, महाराष्ट्रात कोरोनाची परिस्थिती गंभीर आहे तसेच इंटरनेट आणि इतर अनेक तांत्रिक गोष्टींमुळे ऑनलाइन परीक्षेचा विचार करता येत नाही. त्यामुळे, राज्य सरकार दहावी परीक्षेच्या घेतलेल्या निर्णयावर ठाम असल्याचं वर्षा गायकवाड यापुर्वी म्हटल्या होत्या. त्यानंतर आता न्यायालयासमोर हे प्रकरण गेल्यामुळे नेमका काय अंतिम निर्णय होतो, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. मिळालेल्या माहितीनुसार, येत्या दोन दिवसात दहावीच्या परीक्षेबाबत अंतिम निर्णय होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
या सर्व घडामोडींमुळे दहावीतील विद्यार्थ्यांच्या मनात मात्र अनेक संभ्रम निर्माण झाले आहेत. राज्य सरकार मात्र विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा विचार करून परीक्षा रद्द करण्याच्या निर्णयावर ठाम असल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. या सर्व प्रकरणात अंतिम निकाल कधी येतो हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.