छत्तीसगड सरकारचा ‘ओपन बुक पद्धती’ने बारावीची परीक्षा घेण्याचा निर्णय
वृत्तसंस्था / रायपूर : कोरोनामुळे सलग दुसऱ्या वर्षी शैक्षणिक वेळापत्रक कोलमडले आहे. परीक्षांचा हंगाम असतानाच करोनाच्या दुसऱ्या लाटेचा उद्रेक झाला. त्यामुळे केंद्रीय शैक्षणिक मंडळाबरोबर राज्यांतील अनेक शैक्षणिक मंडळांनी दहावीची परीक्षा रद्द करत बारावीच्या परीक्षा लांबणीवर टाकल्या. बारावीच्या परीक्षा कधी होणार? यावरूनही बरेच प्रश्न उपस्थित होताना दिसत असून, छत्तीसगड सरकारने बारावीची परीक्षा घेण्याच्या निर्णयावर शिक्कामोर्तब केले आहे. यासाठी राज्य सरकारने ओपन बुक पद्धतीने परीक्षा घेण्याचे ठरवले आहे.
महाराष्ट्रासह राज्याराज्यांत दहावी-बारावीच्या परीक्षा घेण्यावरून पेच निर्माण झालेला असतानाच छत्तीसगड शिक्षण मंडळाने बारावीची परीक्षा घेण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र यावेळी ओपन बुक पद्धतीने परीक्षा घेण्यावरही शिक्षण मंडळाने शिक्कामोर्तब केला असून, याचाच अर्थ विद्यार्थ्यांना घरातून परीक्षा देता येणार आहे. वाढत्या करोना संकटाचा विचार करून मंडळाने हा निर्णय घेतला आहे.
छत्तीसगड शिक्षण मंडळाने घेतलेल्या निर्णयानुसार १ जूनपासून परीक्षा सुरू होणार आहे. १ ते ५ जून या कालावधीत विद्यार्थ्यांना प्रश्नपत्रिका दिल्या जाणार आहेत. प्रश्नपत्रिका घेऊन गेल्यानंतर विद्यार्थ्यांना पाचव्या दिवशी उत्तरपत्रिका जमा कराव्या लागणार आहेत. म्हणजेच एखाद्या विद्यार्थ्यांने १ जून रोजी प्रश्नपत्रिका घेतल्यानंतर त्याला ५ रोजी उत्तरपत्रिका जमा कराव्या लागणार आहे. तसेच जर एखाद्या विद्यार्थ्यांने ५ जून रोजी प्रश्नपत्रिका घेतली असेल, त्याला १० जून रोजी उत्तरपत्रिका जमा कराव्या लागणार आहेत. विद्यार्थ्याला स्वतःला परीक्षा केंद्रावरून प्रश्नपत्रिका आणाव्या लागणार आहेत. त्याचबरोबर स्वतःच जमा कराव्या लागणार आहेत. हे करत असताना विद्यार्थ्यांची स्वाक्षरीही घेतली जाणार आहे. पोस्टाने उत्तरपत्रिका पाठवल्यास त्या स्वीकारल्या जाणार नाहीत. अशा ओपन बुक पद्धतीने परीक्षा होणार आहे.