धान्याचा काळाबाजार करणाऱ्यांना तहसीलदार विजय बोरुडे यांचा आदेश वजा इशारा
देवरी,दि.21- कोरोना संक्रमण काळात स्वस्त धान्याचा काळाबाजार होऊ नये, शिधापत्रिकाधारकास वेळेवर धान्य उपलब्ध करून द्यावे. आदेशाची अवहेलना झाल्यास संबंधित स्वस्त धान्य दुकानदारांची गय केली जाणार नाही, असा आदेश वजा इशारा देवरीचे तहसीलदार विजय बोरुडे यांनी तालुक्यातील स्वस्त धान्य दुकानदारांना नुकताच दिला आहे.
शासकीय स्वस्त धान्य वितरण व्यवस्था म्हटली की सदैव तक्रारीचा पाढाच वाचला जात असतो. तक्रार करूनही कार्यवाही होत नसल्याने अनेक दुकानदार हे शिधापत्रिकाधारकांना नेहमीच त्रास देत मुजोर झाल्याच्या चर्चा नेहमीच रंगतात. नियमाप्रमाणे धान्य वाटप न करणे, शिधापत्रिका धारकांना वारंवार दुकानाच्या चकरा मारायला भाग पाडणे, परिणामी, त्रस्त झालेले अनेक शिधापत्रिका धान्याची उचल करीत नसल्याच्या तक्रारीत सातत्याने वाढ होताना दिसत होती. सध्या कोरोना संक्रमण काळ असल्याने तालुक्यात टाळेबंदीसह संचारबंदी सुद्धा लागू आहे. यामुळे अनेकांच्या हाताला काम नाही. त्यामुळे नागरिकांच्या पोटापाण्याचा गंभीर प्रश्न उभा ठाकला आहे. यामुळे राज्य व केंद्रशासनाने गरजू लाभार्थ्यांना मोफत धान्य देण्याचे धोरण अंगिकारले आहे.
मात्र, तालुक्यातील काही रेशन दुकानदार धान्याचे वाटप नियमाप्रमाणे न करता त्याची काळ्याबाजारात विल्हेवाट लावत असल्याच्या तक्रारी तालुका प्रशासनाला मिळाल्या होत्या. त्या अनुसंगाने देवरीचे तहसीलदार विजय बोरूडे यांनी अशा दुकानदारांना कडक ताकीद देत कार्यवाहीचा इशारा दिला आहे. धान्य कमी देणे, वाटपच न करणे वा टाळाटाळ करणे,फक्त आंगठा घेऊन ग्राहकाला नाहक त्रास देणे इत्यादि प्रकार यापुढे खपवून घेतले जाणार नसल्याचे तहसीलदार यांनी आपल्या आदेशात म्हटले आहे.
उल्लेखनीय म्हणजे धान्याची अफरातफर करताना अशा रास्त दुकानदाराची पाठराखण सार्वजनिक वितरण व्यवस्थेतील अधिकारी-कर्मचारी करीत असल्याची कुणकुण तालुका प्रशासनाला लागली असल्याने, अशा कर्मचाऱ्यांची सुद्धा गय केली जाणार ऩसल्याचे तहसीलदार यांनी कळविले आहे. अशा तक्रारी प्राप्त झाल्यास संबंधितांविरुद्ध अत्यावश्यक वस्तू विनियम कायदा आणि साथ प्रतिबंधक अधिनियम व आपत्ती व्यवस्थापन अधिनियमच्या विविध कलामांखाली गुन्हा नोंदविण्याचा इशारा सुद्धा तहसीलदार विजय बोरुडे यांनी दिला आहे.