संतापजनक ! पैशासाठी नांदेडमधील डॉक्टरांनी मृत्यूनंतरही कोरोनाग्रस्ताला ठेवलं जिवंत, 3 दिवसांच्या उपचारानंतर पर्दाफाश
नांदेड – कोरोना काळात खासगी रुग्णालयात होत असलेल्या लुटीची अनेक प्रकरणे उघडकीस आली आहेत. मात्र नातेवाईकांकडून पैसे उकळण्यासाठी रुग्णाचा मृत्यू झाल्यानंतरही 3 दिवस उपचार केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. हा प्रताप नांदेड मधील गोदावरी हॉस्पिटलने केला आहे. मयताच्या पत्नीने या विषयाचा भांडाफोड केला असून न्यायालयाच्या आदेशाने शिवाजी नगर पोलीस ठाण्यात डॉक्टर आणि कर्मचाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
डॉक्टर आणि वैद्यकीय कर्मचाऱ्यांविरोधात फसवणूक करणे, उपाचारात निष्काळजीपणा करणे अशा विविध कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तक्रारदार महिलेच्या पतीचा मृत्यू झाल्यानंतर विविध औषध आणि उपचाराच्या नावाखाली आरोपींनी नातेवाईकांकडून लाखो रुपये उकळले. तसेच रुग्णावर काय उपचार केला, याचा तपशील मागितला असता आणखी 40 हजार रुपयांची मागणी केली. याप्रकरणी मृताच्या पत्नीने न्यायालयाचे दरवाजे ठोठावले.
पीडित महिलेने दिलेल्या माहितीनुसार, नांदेड शहरातील मुजामपेठ येथील रहिवाशी असणाऱ्या अंकलेश पवार यांना काही दिवसांपूर्वी कोरोनाची लागण झाली होती. यानंतर अंकलेश यांना 16 एप्रिल रोजी त्यांच्या नातेवाईकांनी गोदावरी कोविड रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले होते. 19 एप्रील रोजी त्यांची प्रकृती खालावली. त्यामुळे त्यांना आयसीयूमध्ये हलवण्यात आले. दुसरीकडे नातेवाईकांकडून पैशांसाठी डॉक्टरांचा तगादा सुरु होता. 21 एप्रिल ते 24 एप्रिल दरम्यान तीन दिवसांत डॉक्टरांनी फिर्यादी शुभांगी पवार यांच्याकडून दीड लाख रुपये घेतले.
पैसे घेतल्यानंतर 24 एप्रिल रोजी सकाळी अकराच्या सुमारास अंकलेश पवार यांचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले. यानंतर दोन दिवसांनी फिर्यादी शुभांगी यांनी आपल्या पतीचे मृत्यूचे प्रमाणपत्र पाहिले. त्यावेळी मृत्यू प्रमाणपत्रावर 21 एप्रिल रोजी रात्री साडे अकरा वाजता रुग्णाचा मृत्यू झाल्याची नोंद त्यांना दिसली. त्यामुळे त्यांनी थेट गोदावरी हॉस्टिपल गाठलं. आपल्या पतीवर काय उपचार केले याबाबतचा तपशील त्यांनी मागितला. मात्र, डॉक्टरांनी पुन्हा 40 हजार रुपयांची मागणी केली. तसेच तपशील मिळणार नसल्याचे सांगेत त्यांना परत पाठवले, असे शुभांगी पवार यांनी सांगितले.
कोरोना बाधित रुग्णाचा 21 एप्रिल रोजी मृत्यू झाला असताना गोदावरी रुग्णालयाने संबंधित रुग्णावर 24 एप्रिल पर्यंत उपचार केले. तसेच उपचाराच्या नावाखाली विविध औषधं मागवली. एवढंचं नाही तर आरोपी डॉक्टरांनी शासनाच्या ठरवून दिलेल्या किमतीपेक्षा जास्तीचे पैसे घेतले, असा आरोप शुभांगी पवार यांनी न्यायालयात धाव घेतली. नांदेडच्या सत्र न्यायालयाने त्यांची बाजू ऐकून घेतल्यानंतर गोदावरी हॉस्पिटलमधील सर्व डॉक्टर आणि कर्मचाऱ्यांविरोधात गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले.