नितीन गडकरींनी सांगितला YouTube वरुन होणाऱ्या कमाईचा आकडा….

केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरींनी मंगळवारी देशातील वेगवेगळ्या विद्यापिठांमधील कुलगुरुंशी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून संवाद साधला. यावेळी गडकरींनी अनेक गोष्टींसंदर्भात खुलासा केला. खास करुन त्यांनी आपण सोशल मीडिया फारसं वापरत नव्हतो मात्र करोना कालावधीमध्ये मी याचा जास्त वापर करु लागल्याचं सांगितलं. करोनामुळे आयुष्यामध्ये काय बदल घडलेत यासंदर्भात बोलताना गडकरींनी आपल्या दैनंदिन आयुष्याबरोबरच सोशल नेटवर्किंगमुळे घडलेल्या बदलांसंदर्भातही सांगितलं. याचवेळी त्यांनी स्वत:च्या यूट्यूब चॅनेलवरुन महिन्याला किती कमाई होते यासंदर्भातील माहितीही दिली. आधी मी फारसा सोशल मीडियावर नव्हतो पण आज मला भाषणांसाठी युट्यूबकडून पैसे मिळतात आणि माझं महिन्याचं इनकम सुरु झालं आहे, असं गडकरी म्हणाले.

करोनामुळे माझ्या आयुष्यात दोन तीन बदल झाले. रोज सकाळ संध्याकाळ मी २५ मिनिटं पायी चालतो. मी मोबाइलवर गाणी ऐकण्याबरोबरच युट्यूबवर अनेक व्हिडीओ पाहतो. मी युट्यूबवर भगवतगीताही ऐकू लागलो. मला दहावा अध्याय आणि त्याचं पूर्ण विवेचन शांततेत ऐकण्याची संधी या कालावधीमध्ये मिळाली. ही माझ्यासाठी मोठी उपलब्ध होती, असं गडकरी यांनी सांगितलं. पुढे बोलताना त्यांनी करोनापूर्व कालावधीमध्ये आपण फार सोशल नेटवर्किंग फ्रेण्डली नव्हतो. मी त्यामुळेच सोशल नेटवर्किंगवर फार सक्रीय नव्हतो. पंतप्रधान मोदी आम्हाला यासंदर्भातील माहिती देत यावर सक्रीय राहण्याचा आग्रह करायचे. मात्र मला ते जमत नव्हतं. करोना कालावधीमध्ये मी जवळजवळ ९५० व्हिडीओ कॉन्फरन्स घेतल्या. या कालावधीमध्ये ट्विटरवर एक कोटी २० लाख फॉलोर्स माझ्याशी नव्याने जोडले गेले, असं गडकरींनी सांगितलं.

पुढे हसतच आपल्या सोशल नेटवर्किंगवरील प्रगतीसंदर्भात बोलताना गडकरींनी, “मी युट्यूबवरुन जी भाषणं दिली त्यासाठी मला आता युट्यूबकडून पैसे दिले जातात. आज मला युट्यूबकडून महिन्याला चार लाख रुपये दिले जातात. हे पैसे मी कोव्हिडसंदर्भातील कामांसाठी देणगी म्हणून दिले आहेत,” अशी माहिती दिली.

या सर्व अनुभवासंदर्भात गडकरींनी एक पुस्तक लिहिलं असल्याचंही सांगितलं. या पुस्तकाच्या १० हजार इंग्रजी प्रती प्रकाशित होण्याआधीच विकल्या गेल्याचंही गडकरी यावेळी म्हणाले. सोशल मीडिया आणि आयुष्यात झालेले बदल हे माझ्यासाठी खूपच वेगळे अनुभव देणारे होते, असंही गडकरींनी यावेळी सांगितलं.

Share