कोरोनाकाळात पंतप्रधान नरेंद्र मोदींची लोकप्रियता घसरली; नवा निष्कर्ष आला समोर

नवी दिल्ली | कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत संपूर्ण देश होरपळून निघत आहे. त्यात पंतप्रधान मोदींच्या प्रतिमेलाही मोठा धक्का बसला आहे. कोव्हिडच्या काळात मोदींची लोकप्रियता ढासळली आणि 63 टक्क्यांवर आली असल्याचं समोर आलं आहे. त्यामुळे इतर देशात ‘शक्तीशाली नेता’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या त्यांच्या या प्रतिमेला धक्का बसला आहे.

अमेरिकन कंपनी असलेल्या माॅर्निंग कन्सल्टंटनं जगभरातील काही राजकीय नेत्यांचा कोरोना काळातील लोकप्रियतेचा अभ्यास केला आहे. त्यामध्ये हा निष्कर्ष समोर आला आहे. माॅर्निंग कन्सल्टंटच्या मते, मोदींची लोकप्रियता आतापर्यंत सगळ्यात कमी स्तरावर गेली आहे. कोरोनाचा विळखा एप्रिलमध्ये जास्त घट्ट झाला होता. त्याकाळात कोरोना रूग्णांत वाढ, कोरोनाने मृत पावणाऱ्या संख्येत मोठ्या प्रमाणात वाढ होत होती. तसेच, देशात लसींचा तुटवडा, ऑक्सिजन सिलेंडरची कमतरता, रेमडेसिवीरच्या इंजेक्शनचा तुटवडा जाणवत होता. या सगळ्या कारणांमुळे देशातील नागरीकांमध्ये रोष निर्माण झाला होता. त्यामुळे एप्रिलमध्ये मोदींच्या लोकप्रियतेत 22 टक्क्यांनी घट झाली होती, असं माॅर्निंग कन्सल्टंटनं आपल्या अभ्यासात स्पष्ट केलं आहे.

मोदींची 2019 साली बहूमतानं निवड झाली होती. त्यावेळी जे बहूमत मिळालं ते गेल्या 3 दशकातील सगळ्यात मोठं बहूमत होतं. त्यामुळं त्यांची एक शक्तीशाली नेता म्हणून इतर देशावर छाप पडली होती. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत केंद्र सरकार चांगलं काम करत आहे, असं मत 59 टक्के लोकांनी नोंदवलं आहे. तर, कोरोनाच्या पहिल्या लाटेत हेच मत 89 टक्के लोकांचं होतं, असं माॅर्निंग कन्सल्टंटनं अहवालात सांगितलं आहे.

दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या लोकप्रियतेची देशात तर घसरण झालीच आहे. मात्र, परदेशातही त्यांची प्रतिमा ढासळत असल्याचं स्पष्ट झालं आहे. मोदींच्या प्रतिमेला सगळ्यात जास्त धक्का नेपाळमध्ये बसला आहे. नेपाळमध्ये कोरोनाचे रूग्ण मोठ्या प्रमाणात वाढत असून त्याला भारतच जबाबदार असल्याचं तिथल्या बऱ्याच नागरीकांचा आरोप आहे.

Share