कोविड संक्रमित व्यक्ती फिरत असल्याची माहिती देणाऱ्या व्यक्तीचे अधिकाऱ्यानेच नाव लीक केल्याने गावात तणावाची स्थिती
देवरी 18- तालुकाचे इन्सिडेंट कमांडर यांनी नुकतेच आदेश काढून तालुक्यातील महत्वाच्या अधिकाऱ्यांना गाव दत्तक दिले असून त्या त्या गावातील कोरोनास्थिती , संक्रमण , ट्रॅकिंग, विलगीकरण , लसीकरण जनजागृती, उपाययोजना इ. विशेष जबाबदाऱ्या दिल्या आहेत. एकीकडे केंद्र व राज्य शासन कोविड संक्रमण रोखण्यासाठी जीवाचे रान करीत आहेत, तर दुसरीकडे मात्र काही अधिकारी शासनाच्या आदेश व सूचनांची कशी खिल्ली उडवितीत, याची प्रचिती देवरी तालुक्यात आली आहे. खबरदारीचा उपाय करण्याऐवजी उलट माहिती देणाऱ्याचे नाव उघड करून गावात तणाव निर्णाण केल्याचा आरोप होत आहे. अशा प्रकरणात जिल्हाधिकारी काय भूमिका घेतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
सविस्तर असे की, देवरी तालुक्यांतर्गत येत असलेल्या सुरतोली येथे गेल्या 5 मे रोजी गावकऱ्यांची कोरोना चाचणी करण्यात आली. यामध्ये 5 लोकांची चाचणी पॉजिटीव्ह आल्याचे सांगण्यात येते. यामध्ये गावातील प्राधिकृत रास्त रेशनदुकानदाराच्या कुटुंबातील सदस्याचाही समावेश आहे. या सर्व सक्रमितांना आरोग्य विभागाने गृहविलगीकरणात राहण्याचा सल्ला दिला. असे असताना संबंधित रास्त दुकानदाराने सुरक्षिततेची कोणतीही उपाययोजना न करता संक्रमित व्यक्तीला विलगीकरणात ठेवणे तर दूरच, पण त्या व्यक्तीचा संचार हा रास्त दुकानात रेशनसाठी येणाऱ्या नागरिकांत सुरू ठेवला. या प्रकरणामुळे नागरिकांत भीतीचे वातावरण पसरले. हे प्रकरण एवढ्यावरच मर्यादित न राहता सदर दुकानदारांचे अख्खे कुटुंबीय गावातील एका तेरवीच्या कार्यक्रमात उपस्थित राहिले. या अत्यंत धोकादायक प्रकरणाची माहिती देवरीचे पुरवठा निरीक्षक तसेच दत्तक गावाचे नोडल अधिकारी सतिस अगळे यांना दिली. यावर श्री अगळे यांना कोणतीही कार्यवाही न करता उलट माहिती देणाऱ्या विरुद्ध दुकानदाराला भडकाविल्याचा आरोप गावकरी करीत आहेत. त्यामुळे गावामध्ये तणावाची परिस्थिती निर्माण झाली असून भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे .
गावकऱ्यांच्या म्हणण्यानुसार, या प्रकरणाची माहिती देवरीचे तहसीलदार विजय बोरुडे यांना सुद्धा दिली असून त्यांनी कुठलीही कार्यवाही केली नाही असा गावकऱ्यांचा आरोप आहे. संबंधित अधिकाऱ्यावर कडक कार्यवाही करण्याची मागणी सामाजिक कार्यकर्ते युगेश पवार यांचेसह माजी जिल्हा परिषद सदस्य दीपक पवार यांनी केली आहे.
याप्रकरणाची सत्यता पडताळून पाहण्यासाठी माध्यमाच्या प्रतिनिधींनी पुरवठा निरीक्षक सतीश अगळे यांच्याशी संपर्क केला असता त्यांनी भ्रमणध्वनी स्विकारण्याचे टाळले. या संदर्भात देवरीचे तहसीलदार विजय बोरुडे यांचेशी संपर्क केल्यावर त्यांनी सतीश अगळे कार्यालयातच असल्याचे सांगत मी प्रकरणाची माहिती घेतो, मला अद्याप या प्रकरणात काहीही माहिती नसल्याचे सांगितले.
या गंभीर प्रकरणाला गोंदियाचे जिल्हाधिकारी किती गांभीर्याने घेतात, याकडे देवरीकरांचे लक्ष लागून आहे.