भंडारा जिल्ह्यात वाघाच्या तीन बछड्यांसह अस्वलाचा मृत्यू : वन्यजीव प्रेमींमध्ये हळहळ


प्रतिनिधी / भंडारा :
भंडारा : वाघाच्या तीन बछड्यासह अस्वलाचा मृत्यू झाल्याचे बुधवारी उघडकीस आले. भंडारा तालुक्यातील गराडा जवळ दोन बछडे तर रावणवाडी जंगलात एक अस्वल मृतावस्थेत आढळले. या घटनेची हळहळ सुरु असतानाच पवनी तालुक्यातील धानोरी बीटमध्ये एका वाघाच्या बछड्याचा मृत्यू झाल्याचे वृत्त धडकले. भंडारा वनविभागासाठी बुधवार हा काळा दिवस ठरला.
भंडारा तालुक्यातील गराडा गावाजवळील टेकेपार उपसा सिंचन प्रकल्पाच्या कालव्यातील सायफन टाक्यात बुधवारी सकाळी ७ वाजता वाघाचे दोन बछडे मृतावस्थेत आढळले. या घटनेची माहिती होताच उपवनसंरक्षक शिवराम भलावी आणि वनपरिक्षेत्रअधिकारी विवेक राजूरकर घटनास्थळी दाखल झाले. दोन महिन्याचे असलेले हे दोन्ही बछडे मादी जातीचे होते. सोमवारी रात्री टाक्यात बुडून मृत्यू झाला असावा असा कयास आहे. वनविभागाने दोन्ही बछड्यांचे मृतदेह ताब्यात घेऊन गडेगाव येथील वनविभागाच्या कार्यालयात शवविच्छेदनासाठी आणले. ही कारवाई सुरु असतानाच भंडारा तालुक्यातील रावणवाडी जंगलात अस्वल मृतावस्थेत असल्याची माहिती मिळाली. रावणवाडी ते धारगाव रस्त्यावर एक मोठे अस्वल मृतावस्थेत आढळून आले. नेमका तिचा कसा मृत्यू झाला हे अद्याप कळले नाही. वनपरिक्षेत्रअधिकारी विवेक राजूरकर घटनास्थळी दाखल झाले.
या दोन घटनांची वनविभाग चौकशी करीत असतानाच पवनी तालुक्यातील धानोरी बिटमध्ये एका वाघाच्या बछड्याचा मृत्यू झाल्याचे समोर आले. या परिसरात असलेल्या वाघीणीला दोन बछडे होते. एका बछड्याला वाघीण सोबत घेऊन गेली. दुसरा बछडा मात्र धानोरी बीटमध्येच राहुन गेला. वनविभागाला या घटनेची माहिती होताच छोट्या बछड्याला रेस्क्यू करीत दूध देण्याचा प्रयत्न केला. तसेच त्याच जागी वाघीण परत येईल व सुटलेल्या बछड्याला घेऊन जाईल म्हणून वनविभागाने बछड्याला तेथेच ठेवले. परंतु बुधवारी सकाळी त्या बछड्याचाही मृत्यू झाल्याचे लक्षात आले. हा बछडा एक महिन्यापेक्षाही लहान असल्याचे सांगण्यात आले. वनविभागाचे अधिकारी तिन्ही प्रकरणाची चौकशी करीत आहेत.

भंडारा जिल्ह्यासाठी काळा दिवस
एकाच दिवशी वाघाचे तीन बछडे आणि एका अस्वलाचा मृत्यू झाला. वनविभागाचा पर्यायाने पर्यावरणाचे देखील मोठे नुकसान झाले. या घटनेने जिल्ह्यातील वन्यप्रेमी व सामान्य नागरिक देखील हळहळ करीत होते. भंडारा जिल्ह्यासाठी बुधवार काळा दिवस ठरला.
जिल्ह्यासाठी आजची घटना अत्यंत दुर्देवी आहे. चार वन्यजीवांचा बळी गेला. भंडारा जिल्हा निसर्ग संपन्न जिल्हा आहे. मोठ्या प्रमाणात वन्यजीव आहेत. बुधवार आम्हा वन्यप्रेमींसाठी काळा दिवस ठरला आहे. वनविभागाने अशा घटना कशा टाळता येतील याकडे लक्ष देण्याची गरज आहे.

Print Friendly, PDF & Email
Share