राज्यावर आस्मानी संकट : घराबाहेर पडतांना काळजी घेण्याचा हवामान खात्याचा सल्ला

पुणे : राज्यात आणखी काही दिवस अवकाळी पावसाची स्थिती कायम राहाणार अंदाज हवामान खात्यानं वर्तवला आहे. तसेच येत्या 24 तासांत कोकणासह गोवा आणि मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी विजांच्या गडगडासह मुसळधार पाऊस होण्याची शक्यता पुणे वेधशाळेनं वर्तवली आहे. तर राज्यात तुरळक ठिकाणी गारपीटही होण्याचा अंदाजही हवामान खात्याकडून व्यक्त करण्यात आला आहे. त्यामुळे नागरिकांना घराबाहेर पडताना योग्य ती काळजी घेण्याचा सल्ला तज्ज्ञांकडून देण्यात आला आहे.


सध्या पश्चिम बंगालच्या किनारपट्टीपासून विदर्भापर्यंत हवेची द्रोणीय स्थिती निर्माण झाली आहे. तर उत्तर कर्नाटकपासून विदर्भापर्यंत वाऱ्याची चक्रीय स्थिती तयार झाली आहे. परिणामी राज्यात विविध ठिकाणी अवकाळी पावसाचे ढग दाटले आहे. ही स्थिती पुढील आणखी पाच दिवस अशीच राहिल असा अंदाजही हवामान खात्याकडून वर्तवण्यात आला आहे. त्यामुळे येत्या पाच दिवसांत मध्य महाराष्ट्र, गोवा, कोकण, विदर्भ आणि मराठवाडा या परिसरात वादळी वाऱ्यासह जोरदार पावसाचा इशारा पुणे हवामान वेधशाळेनं दिला आहे.


गेल्या दोन आठवड्यापासून राज्यात विविध ठिकाणी सातत्यानं अवकाळी पाऊस सुरू आहे. तर कोल्हापूर, सोलापूर, उस्मानाबाद, नाशिक, पुणे, सातारा या जिल्ह्यांत अवकाळी पावसा सोबतचं आणि गारपिटीनंही तडाखा दिला आहे. आज पुणे, नाशिक आणि अहमदनगर या जिल्ह्यांत ताशी 30 ते 40 किमी प्रती तास वेगानं वारा वाहन्याची शक्यता आहे. सोबतचं या जिल्ह्यांत पुढील तीन तासांत विजांच्या कडकडासह जोरदार पावसाची शक्यता आहे. त्यामुळे आकाशात विजा चमकत असताना किंवा पाऊस पडताना मोठ्या झाडाच्या आडोशाला उभं न राहण्याचा सल्ला हवामान तज्ज्ञांकडून देण्यात आला आहे.


भारतीय हवामान खात्यानं नुकत्याच जारी केलेल्या सॅटेलाइट इमेजनुसार, राज्यात मध्य महाराष्ट्रासह दक्षिण मराठवाड्यात अवकाळी पावसाचे ढग घोंघावत आहेत. त्यामुळे पुढील तीन ते चार तासांत मध्य महाराष्ट्रासह दक्षिण मराठवाड्यात मेघगर्जेनेसह वादळी वाऱ्याच्या साथीनं जोरदार पावसाची शक्यता हवामान खात्याकडून वर्तवण्यात आली आहे.

Print Friendly, PDF & Email
Share