गरम पाणी प्यायल्याने कोरोनापासून बचाव होत नाही- केंद्र सरकार

केंद्र सरकाच्या MyGovIndia या अधिकृत ट्विटर अकाउंटवर एक ट्विट करण्यात आलं आहे. “गरम पाणी प्यायल्यानं किंवा गरम पाण्यानं आंघोळ केल्याने कोरोनापासून बचाव होत नाही. कुठल्याही ऐकवी माहितीवर विश्वास ठेवू नये”, असं केंद्र सरकारकडून स्पष्ट करण्यात आलं आहे.

देशात कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढताना दिसत आहे. देशात दैनंदिन पातळीवर चार लाखांहून अधिक नव्या कोरोना रुग्णांची भर पडत आहे. अशा परिस्थितीत नागरिकांच्या भीतीचा फायदा घेऊन काहीजण अफवा देखील पसरवताना दिसत आहेत. कोरोना विषाणूपासून वाचण्यासाठी गरम किंवा कोमट पाणी पिण्याचा सल्ला दिला जात आहे. गरम पाणी प्यायल्यानं किंवा गरम पाण्यानं आंघोळ केल्यानं कोरोनाचा संसर्ग होत नाही, असा दावा सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या अनेक मेसेजमध्ये करण्यात आला आहे. पण यामागचं सत्य काय आहे याचं स्पष्टीकरण आता खुद्द केंद्र सरकारनंच सांगितलं आहे. गरम पाण्याने कोरोनापासून बचाव होऊ शकत नाही, असं केंद्र सरकारकडून स्पष्ट करण्यात आलं आहे.

याशिवाय पीआयबीच्या फॅक्टचेक टीमनंही याबाबत अधिकृत खुलासा केला आहे. सोशल मीडियात सध्या कोरोना विषाणूपासून बचाव करण्यासाठी वेगवेगळे घरगुती उपाय आणि औषधांचे सल्ले दिले जात आहेत. पण त्यात काहीच तथ्य नसल्याचं केंद्रानं स्पष्ट केलं आहे. यात गरम पाणी पिण्याचा सल्ला खूपच व्हायरल झाला आहे. यासोबतच खायच्या पानांचं सेवन करण्याचाही सल्ला देण्यात येत आहे. पण अशाप्रकारचे सल्ले न ऐकण्याचं आवाहन केंद्र सरकारनं केलं आहे. 

Share