देशातील १८० जिल्ह्यांमध्ये गेल्या ७ दिवसांत कोरोनाची एकही रुग्ण नाही : केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ.हर्षवर्धन
दिल्ली : देशात कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत आहे. कोरोना रुग्णांच्या संख्येतही लक्षणीयरित्या वाढत होताना दिसत आहे. गेल्या तीन दिवसांत देशात दररोज ४ लाखांहून अधिक नव्या कोरोना रुग्णांची भर पडत आहे. इतकंच नाही, तर कोरोनामुळे होणाऱ्या मृत्यूंचाही आकडा वाढतो आहे. देशात दररोज ४ हजार रुग्णांचा मृत्यू होतोय.
देशात कोरोनामुळे बिकट परिस्थिती निर्माण झाली असताना केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन यांनी एक वेगळीच आणि सकारात्मक माहिती दिली आहे. देशात गेल्या ७ दिवसांमध्ये एकूण १८० जिल्ह्यांमध्ये कोरोनाचा एकही नवा रुग्ण आढळलेला नाही. तर गेल्या तीन आठवड्यांची आकडेवारी पाहता देशातील ५४ जिल्ह्यांमध्ये गेल्या २१ दिवसांपासून एकही नव्या कोरोना रुग्णाची भर पडलेली नाही.
ग्रूप ऑफ मिनिस्टर्सच्या २५ व्या बैठकीत केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन संबोधित करत होते. “देशात सलग तीन दिवसांपासून कोरोना रुग्णांच्या संख्येत ४ लाखांहून अधिक रुग्णांची भर पडत आहे. गेल्या २४ तासांत देशात ४,०१,०७८ नवे रुग्ण आढळले आहेत. पण दुसरीकडे सकारात्मक बाब अशी की गेल्या २४ तासांत ३ लाख १८ हजार ६०९ रुग्ण कोरोनावर मात करुन सुखरूप घरी देखील पोहोचले आहेत. आता देशाची एका दिवसाची चाचण्यांची क्षमता २५ लाख इतकी झाली आहे. गेल्या २४ तासांत देशात १८ लाख ८ हजार ३४४ कोरोना चाचण्या करण्यात आल्या आहेत”, असं डॉ. हर्षवर्धन यांनी सांगितलं.
देशात गेल्या २४ तासांत ४ हजार १८७ रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. तर आतापर्यंतचा एकूण मृत्यूंचा आकडा २ लाख ३८ हजार २७० वर पोहोचला आहे. तर एकूण रुग्णांची संख्या २ कोटी १८ लाख ९२ हजार ६७६ इतकी झाली आहे.