हवेतून ऑक्सिजन निर्मितीचे 38 PSA प्लांट राज्यात कार्यान्वित, आणखी 350 प्लांट बसवणार

मुंबई : राज्यात कोरोना बाधित रुग्णांमध्ये वाढ होत असल्याने ऑक्सिजनचा तुटवडा जाणवत आहे. ऑक्सिजनच्या तुटवड्यावर मात करण्यासाठी राज्य शासनामार्फत प्रयत्न केले जात आहेत. राज्यात जिल्हा रुग्णालये, वैद्यकीय महाविद्यालये, खासगी रुग्णालये या ठिकाणी हवेतून ऑक्सिजन शोषून तो रुग्णांना देणारी प्रणाली (PSA) बसवण्यात येत आहे. आतापर्यंत 38 पीएसए प्लांट कार्यान्वित झाले असून त्याद्वारे दिवसाला सुमारे 53 मेट्रिक टन ऑक्सिजन निर्मिती होत असल्याची माहिती, राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे.

राज्यात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा सामना करताना ऑक्सिजनची मोठ्या प्रमाणात मागणी वाढली आहे. राज्यात 1250 मेट्रीक टन ऑक्सिजनचे उत्पादन होत आहे. सध्या राज्यात ऑक्सिजनची मागणी 1750 मेट्रिक टन आहे. उर्वरित ऑक्सिजनची मागणी भरून काढण्यासाठी इतर राज्यांमधून ऑक्सिजन आणला जात आहे. इतर राज्यातून ऑक्सिजन आणत असताना स्थानिक पातळीवर देखील ऑक्सिजन निर्मिती व्हावी यासाठी हवेतून ऑक्सिजन शोषून तो रुग्णांना देणाऱ्या तंत्रज्ञानाच्या आधारावर हे प्लांट उभारण्यात आले आहेत. असे राजेश टोपे यांनी सांगितले.

500 मेट्रिक टनचे उद्दिष्ट

राजेश टोपे पुढे म्हणाले, ऑक्सिजनच्या बाबतीत राज्य स्वयंपूर्ण होण्यासाठी प्रयत्न करण्यात येत आहे. आतापर्यंत जिल्हाधिकाऱ्यांमार्फत 150 पीएसए प्लांटसाठी ऑर्डर देण्यात आली आहे. राज्यात अशा प्रकारचे 350 प्लांट बसवण्याचे नियोजन आहे. या प्लांटच्या माध्यमातून 500 मेट्रिक टन ऑक्सिजन निर्मितीचे उद्दिष्ट असल्याचे टोपे यांनी सांगितले.

राज्यात कुठे आहेत PSA प्लांट

राज्यात कार्यान्वित झालेले हे 38 पीएसए प्लांट बुलढाणा, वाशीम, बीड, लोखंडी सावरगाव, हिंगोली, जालना, नांदेड, उस्मानाबाद, सिंधुदूर्ग, मुंबई, अलिबाग, रत्नागिरी, गोंदिया, अहमदनगर, शिरपूर, भुसावळ, नंदूरबार, शहदा, सातारा, पुणे, चिखली, खामगाव येथील जिल्हा रुग्णलय, विद्यकीय महाविद्यालय, खासगी रुगणालय याठीकाणी हे प्लांट बसवण्यात आले असून ते कार्यान्वित झाले आहेत.

केंद्राच्या मदतीने या ठिकाणी प्लांटची उभारणी

वाशिम, सातारा, हिंगोली, अहमदनगर, भंडारा, अलिबाग, रत्नागिरी, बुलढाणा, उस्मानाबाद आणि सिंधुदूर्ग येथील जिल्हा रुग्णालयामध्ये केंद्र शासनाच्या मदतीने हेवेतील ऑक्सिजन शोषून तो शुद्ध करुन रुगणांना पुरवणारे पीएसए प्लांट बसवण्यात आले आहेत. वैद्यकीय ऑक्सिजनच्या मागणीमुळे जाणवणाऱ्या तुटवड्याच्या पार्श्वभूमीवर ह्या प्रकल्पातील ऑक्सिजनचा वापर हा रुग्णांसाठी वरदान ठरत असल्याचे राजेश टोपे यांनी सांगितले.

Print Friendly, PDF & Email
Share