Breaking News: ‘एनकाउंटर स्पेशालिस्ट’ दया नायक यांची मुंबईतून थेट गोंदियात बदली
PraharTimes
वृत्तसंस्था/ मुंबई: एन्काउंटर स्पेशालिस्ट अशी ओळख असलेले व सध्या मुंबई शहर दहशतवाद विरोधी पथकात सेवेत असलेले पोलीस निरीक्षक दयानंद बड्डा नायक यांची थेट गोंदियात बदली करण्यात आली आहे. प्रशासकीय कारणास्तव ही बदली करण्यात येत असल्याचे नमूद करण्यात आले आहे.
अपर पोलीस महासंचालक कुलवंत कु. सारंगल (आस्थापना) यांनी दया नायक यांच्य बदलीचा आदेश काढला आहे. दया नायक हे सध्या दहशतवादी विरोधी पंथक मुंबई येथे सेवेत आहेत. त्यांची तिथून गोंदिया जिल्हा जात प्रमाणपत्र समिती येथे बदली करण्यात येत आहे. त्यांना दहशतवाद विरोधी पथकाचे अपर पोलीस महासंचालक यांनी बदलीच्या ठिकाणी हजर होण्यासाठी कार्यमुक्त करावे व तसे कळवावे, त्याचवेळी गोंदिया जिल्हा जात पडताळणी समिती उपसंचालकांनीही दया नायक हे तेथे हजर झाल्याची तारीख कळवावी, असे आदेशात नमूद करण्यात आले आहे.
दरम्यान, दया नायक यांच्या बदलीमागे प्रशासकीय कारण देण्यात आले असले तरी त्यावर उलटसुलट चर्चा सुरू झाल्या आहेत. गेल्या काही दिवसांपासून पोलीस दलात मोठ्या प्रमाणात फेरबदल सुरू आहेत. अँटिलिया स्फोटकं प्रकरण आणि मनसुख हिरन हत्या प्रकरण पुढे आल्यानंतर बदल्यांचा धडाकाच लावण्यात आला आहे. या प्रकरणात गुन्हे शाखेतील सचिनवाझे यांना अटक झाल्यानंतर गुन्हे शाखेतून घाऊक बदल्या झाल्या होत्या. त्यासह अनेक वरिष्ठ अधिकाऱ्यांच्याही बदल्या झालेल्या आहेत. बदली यादीत आता दया नायक हे आणखी एक नाव जोडले गेले आहे. दया नायक यांनी गेल्या वर्षभरात अनेक हाय प्रोफाइल प्रकरणं हाताळली आहेत. मुख्य म्हणजे मनसुख हिरन हत्येचा तपास करण्यासाठी ज्या टीम नेमल्या होत्या. त्यातील जूहू एटीएसच्या टीमला दया नायक लीड करत होते. त्यांची अशी तडकाफडकी बदली झाल्याने चर्चेला ऊत आला आहे.