पीएमओ बिनकामाचे, भाजप खासदाराची मागणी : कोरोनाविरुद्धच्या लढ्याचे नेतृत्व गडकरींकडे द्या


वृत्तसंस्था / नवी दिल्ली :
देशामध्ये कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने थैमान घातले आहे. रोज साडेतीन लाखांहून अधिक नवे रुग्ण देशात आढळून येत आहेत. कोरोना परिस्थिती हाताळण्यात केंद्रातील मोदी सरकारला अपयश आल्याची टीका विरोधी पक्षांकडून केली जात आहे. असे असतानाच आता थेट भाजपाचे राज्यसभा खासदार सुब्रमण्यम स्वामी यांनी केंद्राला घरचा आहेर दिला. पंतप्रधान कार्यालय हे सध्याच्या कोरोना माहमारीच्या काळामध्ये काहीच कामाचे नसून सध्याची कोरोना परिस्थिती हातळ्याची सर्व जबाबदारी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी त्यांचे सहकारी असणाऱ्या नितीन गडकरी यांच्याकडे द्यावी, अशी मागणी स्वामी यांनी केली. स्वामी यांनी सध्याचे आरोग्यमंत्री डॉ. हर्ष वर्धन हे खूपच नम्र असून त्यांना त्यांच्या खात्याचे काम मोकळेपणाने करु दिले जात नसल्याचे म्हटले आहे.


“ज्याप्रमाणे भारत इस्लामिक आक्रमणे आणि ब्रिटीश साम्राज्यवाद्यांनंतरही टिकून राहिला त्याचप्रमाणे आपण करोना व्हायरसच्या साथीचा सामना करुन नक्कीच टीकू. आता आपण नीट काळजी घेतली नाही, योग्य निर्बंध लावले नाहीत तर मुलांवर परिणाम करणारी आणखीन एक लाट आपल्याकडे येईल. म्हणून मोदींनी या कोरोनाविरुद्धच्या युद्धाची जबाबदारी गडकरींकडे सोपवावी. पंतप्रधान कार्यालयावर अवलंबून राहणे फायद्याचे ठरणार नाही,” असे स्वामी यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे.


तसेच अन्य एका ट्विटमध्ये मी पंतप्रधान कार्यालयासंदर्भात भाष्य केले असून तो एक विभाग आहे. पंतप्रधान कार्यालय म्हणजे पंतप्रधान नाहीत हे लक्षात घ्यावे , असेही स्वामींनी म्हटले आहे. स्वामी यांच्या या ट्विटवर सध्याचे आरोग्यमंत्री असणाऱ्या हर्ष वर्धन यांना पदावरुन काढून टाकण्याची मागणी केली त्यावरही स्वामींनी उत्तर दिले . “नाही, हर्ष वर्धन यांना मोकळेपणे काम करु दिले जात नाही. मात्र अधिकार वाणीने बोलणाऱ्या नेत्यांसारखे ते नसून खूपच नम्र आहेत. गडकरींच्या सोबत काम केल्याने त्यांच्यातील हा गुण नक्कीच बहरेल,” अशी अपेक्षा स्वामींनी व्यक्त केली आहे.

Print Friendly, PDF & Email
Share