कोरचीत खर्रा विक्रेत्यावर दंडात्मक कारवाई


प्रतिनिधी / गडचिरोली :
कोरची शहरातील ग्रामीण रुग्णालयासमोर खर्रा विक्री करणाऱ्याकडून २१ खर्रे जप्त करीत दंडात्मक कारवाई करण्यात आली. या मोहिमेत स्थानिक पोलिस स्टेशनचे कर्मचारी, नगरपंचायत व मुक्तीपथ तालुका चमू सहभागी झाले होते.
कोरोना विषाणूचे वाढते संक्रमण लक्षात घेता राज्य सरकारने लॉकडाउन जाहीर केले आहे. तंबाखूजन्य पदार्थांचे सेवन करून सार्वजनिक ठिकाणी थुंकल्यामुळे कोरोना विषणूचा पसार होत असल्याचे पुढे आले आहे. त्यामुळे कोरोना महामारीचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी तंबाखूजन्य पदार्थांची विक्री करण्यास बंदी घातली आहे. नियमांचे उल्लंघन करीत खर्रा विक्री करणाऱ्या कोरची शहरातील एका व्यवसायिकावर दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे.
स्थानिक ग्रामीण रुग्णालयाच्या समोर चोरट्या मार्गाने खर्रा विक्री सुरु असल्याची माहिती प्राप्त होताच कोरची पोलिस, नगरपंचायत व मुक्तिपथ तालुका चमूने दुकानाची तपासणी केली. यावेळी २१ खर्रे आढळून आले. याप्रकरणी संबंधितावर ५०० रुपयांचा दंड ठोठावत पुन्हा तंबाखूजन्य पदार्थांची विक्री न करण्याचे आवाहन केले आहे.

Print Friendly, PDF & Email
Share