ऑक्सिजनसाठी गोळीबार :गुजरातमध्ये भीषण अवस्था
वृत्तसंस्था / गुजरात : कोरोना विषाणूची दुसरी लाट देशात प्रचंड नुकासन करणारी ठरली आहे. तर दुसरीकडे ऑक्सिजन कमी पडत असल्यानं नागरिक हैराण झाले आहेत. आता ऑक्सिजनसाठी लोक एकमेकांचा जीव घेतील अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. गुजरातच्या कच्छमध्ये काहीजण ऑक्सिजन सिलिंडर रिफिल करणाऱ्या कंपनीत शिरले आणि तिथल्या कर्मचाऱ्यांना धमकावण्यात आलं, गोळीबार देखील करण्यात आला.
सांगण्यात येत आहे की, कंपनीचे कर्मचारी आणि कंपनीत शिरलेल्या काही लोकांमध्ये वाद झाला. ऑक्सिजन रिफिल करण्यावरून हा वाद झाल्याचं कळतं आहे. तसंच आत शिरलेल्या या लोकांनी कर्मचाऱ्यांवर बंदूक रोखली आणि मारामारी सुरू केली. एका गुंडाने तर सलग तीनवेळा हवेत गोळीबार करत दहशत निर्माण केली.
घटनेची माहिती पोलिसांना मिळताच पोलीस त्या ठिकाणी पोहोचले. मात्र तो पर्यंत हे गुंड तिथून फरार झाले होते. पोलिसांनी याप्रकरणी एफआयआर दाखल करून तपास सुरू केला आहे. लवकरच या गुंडाना अटकेत टाकण्यात येईल असा दावा पोलिसांनी केला आहे. मात्र या घटनेमुळे ऑक्सिजन सेंटरवर काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांमध्ये एकप्रकारची भिती बसली आहे. त्यामुळे बऱ्याच अडचणींचा सामना करावा लागत आहे.
या घटनेत पोलिसांचे म्हणणे आहे की भचाऊ नगरच्या जवळ मोटा चिराई गावात ऑक्सिजन भरते वेळी काही जणांमध्ये वादावादी झाली आणि त्यानंतर परिस्थिती इतकी बिघडली की एका व्यक्तीनं पिस्तुल काढून गोळीबार सुरू केला.
गुजरातमध्ये कोरोनाचं संकट दिवसेंदिवस वाढत आहे. लोकांना बेड नाहीत, ऑक्सिजन उपलब्ध नाहीत. ज्यामुळे अनेक स्थानिकांना संकटांचा सामना करावा लागत आहे.