नागपूरमध्ये आरोग्यव्यवस्थेचे तीनतेरा; ज्या तुकाराम मुंढेंचा भर सभागृहात अपमान केला त्यांनाच पुन्हा बोलवण्याची मागणी
नागपूर, दि.२८ एप्रिल: कोरोनाच्या प्रकोपामुळे नागपूरमध्ये आरोग्यव्यवस्थेचे तीनतेरा वाजल्याने काँग्रेसचे नगरसेवक बंटी शेळके यांनी विभागीय कार्यालयात प्रचंड गोंधळ घातला. यावेळी त्यांनी तुकाराम मुंढे यांना पुन्हा नागपुरात आणा, अशी मागणी केली. तुकाराम मुंढे यांच्यासारखे खमके अधिकारी असल्याशिवाय सरकारी अधिकारी सुधारणार नाहीत, असे त्यांनी म्हटले.
बंटी शेळके यांनी विभागीय आयुक्त घातलेल्या या गोंधळाचा व्हीडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. यावेळी त्यांनी सरकारी अधिकाऱ्यांवर आरडाओरडा करत ‘यांना जाळून टाकू’, अशी धमकीही दिली. यावेळी काँग्रसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले आणि आमदार अभिजित वंजारीही उपस्थित होते. या सगळ्यांदेखत बंटी शेळके यांनी नाशिकमधील सरकारी अधिकाऱ्यांवर चांगलेच तोंडसुख घेतले.
ज्या तुकाराम मुंढेंचा भर सभागृहात अपमान केला त्यांनाच पुन्हा बोलवण्याची वेळ
कोरोना उपाययोजनांच्या अंमलबजावणीवरुन आयुक्त तुकाराम मुंढे आणि नगरसेवकांमध्ये सातत्याने खटके उडत असल्यामुळे जून महिन्यात त्यांच्याविरोधात अविश्वास प्रस्ताव दाखल करण्यात आला होता. तत्कालीन महापौर संदीप जोशी यांनी हा प्रस्ताव फेटाळून लावला होता. मात्र, त्यावेळी भाजपच्या नगरसेवकांनी मुंढे यांच्यावर अत्यंत तिखट शब्दांत टीका केली होती.
भाजपचे महापालिकेतील सत्तापक्ष नेते दयाशंकर तिवारी हे आवाज चढवून सभेत आयुक्तांसोबत बोलत होते. जर अशाच अविर्भावात भाजपचे नगरसेवक बोलणार असतील, तर मी सभेतून निघून जाईन, असे मुंढे यांनी ठणकावले. त्यावर भाजपचे दयाशंकर तिवारी यांनी ‘सभागृहातूनच काय नागपुरातूनही चालते व्हा’ असे उत्तर त्यांना दिले. तर काँग्रेसचे नगरसेवक हरिश ग्वालवंशी यांनी संत तुकाराम यांच्या नावाला महापालिका आयुक्त मुंढे यांनी त्यांच्या कृतीमुळे कलंक लावू नये, असे विधान केले. नगरसेवकांच्या या अरेरावीमुळे तुकाराम मुंढे प्रचंड व्यथित झाले. त्यामुळे तुकाराम मुंढे रागाच्या भरात सभागृहातून निघून गेले होते.