जीवनावश्यक वस्तूंची विक्री आता सकाळी 7 ते 11 पर्यंत
देवरी 20- कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता ब्रेक द चैन अंतर्गत आता तालुक्यातील जीवनावश्यक वस्तू विक्री करण्याच्या वेळापत्रकात बदल करण्यात आले आहे. परिणामी, सर्व जीवनावश्यक वस्तूंची विक्री आता सकाळी 7 ते 11 वाजेपर्यंत अटीशर्तींच्या आधारेच सुरू राहील, अशी माहिती देवरीचे तहसीलदार आणि इंसिडेंट कमांडर विजय बोरूडे यांनी दिली आहे.
सविस्तर असे की, कोरोना संक्रमण काऴात तालुक्यातील परिस्थिती नियंत्रणात ठेवण्यासाठी केवळ जीवनावश्यक वस्तूंच्या विक्रीसाठी परवानगी देण्यात आली होती. सकाळी 7 ते दुपारी 3 वाजेपर्यंत ही दुकाने सुरू ठेवण्याचा आदेश होता. या व्यवसायाशी संबंधित व्यापाऱ्यांना मास्कचा वापर करणे, सनिटाइजरचा वापर, दुकानासमोरील खुल्या भागात प्लास्टिक शिल्डींग करणे, समाजिक अंतर राखणे तसेच स्वतः आणि कामगारांची कोरोना चाचणी करून घेणे आदी बंधनकारक करण्यात आले होते. असे असले तरी अनेक ठिकाणी या नियमांचे सर्रास उल्लंघन होत असल्याचे प्रशासनाला दिसून आले आहे. त्यामुळे आता आणखी कडक उपाय योजना करण्याची आवश्यकता भासल्याने या सर्व व्यावसायिक प्रतिष्ठानांना आपली दुकाने उद्या दि.21 पासून सकाळी 7 ते 11 वाजेपर्यंतच सुरू ठेवता येणार आहेत. हे सर्व व्यवहार करताना शासनाने घालून दिलेल्या उपरोक्त सर्व अटीशर्तींचे पालन करणे संबंधितांवर बंधनकारक असून याची सक्तीने अंमलबजावणी करण्यात येणार आहे. कोविड चाचणी न करता दुकाने उघडी ठेवल्यास कोरोना संक्रमण कालावधी संपेपर्यंत संबंधिताना आपली दुकाने उघडता येणार नाही. अटींचे उल्लंघऩ करणाऱ्यावर कडक कार्यवाही करण्याचा इशारा देण्यात आला आहे. तरी संबंधितांनी आणि सर्व नागरिकांनी या बाबीची गंभीर दखल घेवून आपातस्थिती नियंत्रणात ठेवण्यास प्रशासनास सहकार्य करण्याचे आवाहन तहसीलदार बोरूडे यांनी केले आहे.