कोरोना विस्फोट
दहशत माजवत कोरोना,
सर्व रोगांना मागे टाकून गेला. || १ ||
रोज मृत्यूचे सापळे पाडून,
प्रत्येक समाजाला रडवून गेला. || २ ||
दुःखाचे मोठे डोंगर रचून
राक्षसासारखा हसून गेला. || ३ ||
आता वाईट होतच राहील,
दुष्ट शाप असा देऊन गेला. || ४ ||
रोगाचे संक्रमण जलद करून,
अचानकपणे तो फसवून गेला. || ५ ||
घरचं आपली शाळा असणार,
विद्यार्थ्यांना हे भासवून गेला. || ६ ||
एकवेळेचं सामान्याने जेवायचं,
ठामपणे तो ठरवून गेला. || ७ ||
आर्थिक स्थिती बिघडवून,
श्रीमंतास भिकारी बनवून गेला. || ८ ||
अडाण्याला तंत्रज्ञान वापरण्यास,
खूपच सक्तीचं करून गेला. || ९ ||
नोकरी करणाऱ्या चाकरमण्यास,
कायमचं घरात बसवून गेला. || १० ||
बिनपैशाचं कस जगायचं,
कानात हळुवार सांगून गेला. || ११ ||
घराबाहेर पडायचे की नाही,
मोठ्या संभ्रमात पाडून गेला. || १२ ||
इकडे आड – तिकडे विहीर,
संकट मोठे दाखवून गेला. || १३ ||
कोरोना आला या जगतावरी,
खूप काही शिकवून गेला. || १४ ||
============================
©️ कवी: भूषण सहदेव तांबे
मुंबई