गावातील लोकांचे नशीब फुटके ? नाईलाजास्तव पितात दूषित पाणी..!प्रशासनाची भूमिका शुन्य ?

दूषित पाण्यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात

दुसऱ्या दिवशी पाणी पुरवठा पुन्हा खंडित

देवरी 15:
देवरी तालुक्यातील ओवारा गावातील पाण्याची समस्या प्रहार टाईम्स ने प्रशासनासमोर मांडली असता तडजोड करून पाणी पुरवठा सुरु करण्यात आला परंतु पुरविलेले पाणी इतके दूषित आहे कि जनावरे सुद्धा पाणी पित नाही.

एक दिवस पाणी पुरविल्या नंतर पुन्हा तो खंडित करण्यात आला असून या समस्यांचा समाधान ग्राम पंचायत प्रशासनाकडून व पंचायत समिती कडून करण्यात आला नसून गावकरी “आमचे नशीबचं फुटके आहे , आम्हाला जनावरे देखील पित नाही असे दूषित पाणी पुरविले जात ” असल्याचा संताप करीत आहेत.

यापूर्वी केवळ ट्रान्सफार्म जळाली म्हणून गावात 2 महिने पाणी सोडले नाही असे सरपंचानी सांगितले. संबंधित विभागच्या अधिकाऱ्याशी बोलले असता विद्युत सुरळीत सुरु असल्याचे उत्तर मिळाले होते.

यात ग्रामपंचायत प्रशासनाला गावच्या पाणी पुरवठ्याचे काही देणेघेणे नाही. गावचा पाणी पुरवठा दूषित असतो त्याला साधा शुद्धीकरण सुद्धा करीत नाही. ग्रामपंचायतीचे प्रशासन नेमके काय करते यावर प्रश्न चिन्ह उभा आहे .

गावातील नळाला दूषित पाणीपुरवठा होतो आहे. याविषयी वारंवार तक्रार करून दखल घेतली गेली नाही. ग्रामपंचायत पदाधिकारी लोकांच्या जीवितासी खेळत असल्याचे स्पष्ट दिसत आहे.

भविष्यात हा प्रश्न लवकर सुटण्याची कोणतीही चिन्ह नाहीत. त्यामुळे पाणीप्रश्न मार्गी लागावा म्हणून आंदोलन उभे करावे लागणार कि काय असे जनमत तयार होऊ लागले आहे.

“ग्रामपंचायत सरपंच व ग्रामसेवकाशी चर्चा केली” चंद्रमणी मोडक ( खंड विकास अधिकारी पं.स . देवरी )

ट्रान्सफार्म दुरुस्त केला तो पुन्हा जळाला , नवीन ट्रान्सफार्म साठी अर्ज केला , लॉकडाउन असल्यामुळे ट्रान्सफार्म केव्हा येणार सांगता येऊ शकत नाही तो पर्यंत पाणी पुरवठा बंद राहील.” -एस. डी . मुंढे (ग्रामसेविका ओवारा )

सदर समस्यांवर संबंधित व्यक्ती आपली जबाबदारी झटकत असून लोकांना दूषित पाणी पुरवठा करीत असून पुन्हा उन्हाळ्याच्या कडाक्यात गावकरी पाण्यासाठी वनवन भटकणार हे निश्चितच!

Share