सीबीएसई बोर्डाचा मोठा निर्णय, दहावीची परीक्षा रद्द, 12 वीची परीक्षा पुढे ढकलली

बारावीच्या परीक्षा पुढे ढकलल्या तर दहावीची परीक्षा रद्द

केंद्रीय शिक्षण मंत्रालयानं दहावीच्या परीक्षा रद्द केल्याची माहिती दिली आहे. दहावीचा निकाल सीबीएसई बोर्डाकडून वस्तूनिष्ठ पद्धतीनं तयार करण्यात आलेल्या मानाकांच्या आधारे जाहीर करण्यात येणार आहे. तर, बारावीच्या परीक्षा पुढे ढकलण्यात आल्या आहेत. परीक्षा घेण्यासंदर्भात 1 जूनला परिस्थितीची पाहणी करण्यात येईल, अशी माहिती केंद्रीय शिक्षण मंत्रालयानं दिली आहे. त्यामुळे सीबीएसई बोर्डाच्या परीक्षा जूनपर्यंत होणार का? हे पाहावं लागेल.

सीबीएसई बोर्डाच्या लेखी परीक्षेला 4 मे पासून सुरुवात होणार होती. सध्या देशात दररोज 1 लाखांपेक्षा जास्त कोरोना रुग्ण आढळून येत आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांनी बोर्ड परीक्षा रद्द करा, अशी मागणी सोशल मीडियावर केली होती.  विद्यार्थ्यांच्या या मागणीला अभिनेता सोनू सूद, गायक अरमान मलिक, काँग्रेस नेते राहूल गांधी, प्रियांका गांधी, नवी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी परीक्षा रद्द करावी किंवा दुसरा मार्ग काढण्यात यावा, अशी मागणी केली होती. नरेंद्र मोदी यांच्यासोबत झालेल्या बैठकीनंतर सीबीएसई बोर्डाच्या बारावीच्या परीक्षा पुढे ढकलण्याचा तर दहावीच्या परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

बोर्ड परीक्षा रद्द करा, 1 लाख विदयार्थ्यांची मागणी

सध्या वाढलेल्या कोरोना विषाणू संसर्गाच्या पार्श्वभूमीवर दहावी आणि बारावीच्या एक लाख विद्यार्थ्यांनी परीक्षा रद्द करा किंवा ऑनलाईन पद्धतीनं घ्या, असी मागणी केली होती. मात्र, सीबीएसईनं विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी योग्य उपाययोजना करण्यात आल्याची माहिती दिली होती. विद्यार्थ्यांकडून परीक्षा ऑनलाईन पद्धतीनं आयोजित कराव्यात यासाठी मागणी करण्यात येत होती.

Share