मोठी बातमी…. रेमडेसिवीर इंजेक्शनच्या निर्यातीवर केंद्र सरकारनं घातली बंदी; कोरोनाच्या पार्श्वभूमीवर निर्णय

कोरोनावर गुणकारी असलेल्या रेमडेसिवीर इंजेक्शन आणि औषधांची निर्यात थांबविण्याचा महत्वपूर्ण निर्णय केंद्र सरकारनं घेतला आहे.

देशातील प्रत्येक स्थानिक औषध निर्मिती संस्थांना त्यांच्या संकेतस्थळावर रेमडेसिवीरचा उपलब्ध साठ्याची माहिती देण्याचेही आदेश केंद्रानं दिले आहेत. याशिवाय देशातील सर्व औषध प्रशासन आणि अधिकाऱ्यांना रेमडेसिवीर औषधांच्या साठ्याची इत्यंभूत माहिती आणि नोंद घेण्याच्या सूचना देखील केंद्रानं जारी केल्या आहेत. रेमडेसिवीरचा काळाबाजार थांबविण्यासाठी देखील योग्य ती कडक कारवाई करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

देशात कोरोनाची वाढती संख्या लक्षात घेता येत्या काळात रेमडेसिवीरची देशांतर्गत मागणी मोठ्या प्रमाणात वाढू शकते. त्यामुळे देशांतर्गत मागणी पूर्ण करण्यासाठी रेमडेसिवीरच्या निर्यातीवर बंदी घालण्यात येत असल्याचं केंद्रानं म्हटलं आहे. रेमडेसिवीरच्या उप्तादनावरही बारकाईनं लक्ष असल्याचंही केंद्रानं सांगितलं आहे.

कोरोना रुग्णांसाठी रेमडेसिवीर इंजेक्शन आणि औषध गुणकारी ठरत असल्यानं मागणी वाढली आहे. याचाच फायदा घेत या औषधाचा काळा बाजार सुरू असल्याचीही प्रकरणं पुढे आली आहेत. राज्यात अनेक ठिकाणी रेमडेसिवीरचा काळा बाजार करणाऱ्यांवर कारवाई देखील करण्यात येत आहे.

राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनीही शनिवारी सर्वपक्षीय बैठकीत रेमडेसिवीरच्या निर्यातीवर केंद्र सरकारनं बंदी घालावी, अशी मागणी केली होती. राज्यातील रुग्णांना रेमडेसिवीर सहज उपलब्ध व्हावे यासाठी याचा देशपातळीवर निर्णय व्हावा असं टोपे म्हणाले होते.

Print Friendly, PDF & Email
Share