स्वच्छ देवरी , सुंदर देवरीचे स्वप्न भंगणार का ?

डॉ. सुजित टेटे

प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे चक्क शिक्षक कॉलनी मध्ये तयार झाला “डम्पिंग यार्ड” , स्वच्छ सर्वेक्षण फक्त नावा पुरतेच ?

देवरी 8: नगरपंचायत देवरी द्वारा स्वच्छ सर्वेक्षण नुकतेच पार पडले असून विविध उपक्रम राबवून जनजागृती करण्यात आली परंतु दुर्लक्षित कारभारामुळे नागरिकांच्या आरोग्यास धोका निर्माण झाला आहे . प्राप्त माहितीनुसार स्वच्छ सर्वेक्षणाची जनजागृती करण्यासाठी चौका चौकात रंगरंगोटी करून निधी खर्च करण्यात आला . चित्रकला , लोकनाट्य , निबंध स्पर्धा , वॉल पेंटिंग सारख्या विविध स्पर्धाचे आयोजन करून ओला कचरा , सुखा कचरा स्वच्छता आदी विषयावर जनजागृती देखील करण्यात आली .

सविस्तर असे कि देवरी येथील शिक्षक कॉलनी च्या गणेश चौकातील दर्शनी भागात मोठी रंग रंगोटी करून स्वच्छ देवरी चे संदेश देण्यात आले परंतु रंगरंगोटी केलेल्या जागे पासून अंदाजे 300 मिटर अंतरावर चक्क ‘डम्पिंग यार्ड’ तयार झालेले असून याकडे नगरपंचायत प्रशासनाचे लक्ष का जात नाही? असा सवाल उपस्थित होत आहे .

संबंधित विषयावर स्थानिक नागरिकांशी संवाद साधला असता घंटा गाडी नियमित येत नसल्यामुळे घरातील कचरा डस्टबिन मध्ये सडतो त्यामुळे कचरा उघड्यावर टाकण्यात येते अशी माहिती समोर आली .

सॅनेटरी वेस्टेज , प्लास्टिक , घाणेरडा कचरा बाहेर टाकल्यामुळे हवेच्या प्रवाहासोबत सदर वेस्टेज घरासमोर येतात त्यामुळे आरोग्यास धोका निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही .

घाणीचे सामाज्य होण्या अगोदर नगरपंचायत प्रशासनाने व अधिकाऱ्यांनी मॉनिटरिंग करून नागरिकांच्या आरोग्याची काळजी घेणे आवशयक आहे आणि स्वच्छ देवरी सुंदर देवरी ला आरोग्यदायी देवरी करण्याकडे लक्ष केंद्रित करायला हवे.

Share