धक्कादायक! दहा हजार रुपयात पॉझिटिव्हचा निगेटिव्ह अहवाल!

नागपूर : करोना निगेटिव्ह अहवाल देण्यासाठी शहरातील खासगी प्रयोगशाळा दहा हजार रुपयांची मागणी करून जनतेची लूट करीत असल्याचा आरोप करून या प्रयोगशाळेवर कडक कारवाईची मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे शहर उपाध्यक्ष श्रीकांत शिवणकर यांनी गुरुवारी पत्रकार परिषदेत केली.

विमान प्रवासासाठी आरटीपीसीआर चाचणी आवश्यक आहे. त्यामुळे परदेशात जात असलेल्या एकाने ११ मार्च २०२१ ला (कुठलेही लक्षण नसताना ) करोना चाचणीसाठी डॉ. दिनेश अग्रवाल यांच्या बायो पॅथ या रामदासपेठेतील नामांकित प्रयोगशाळेला नमुने दिले. ते स्वत: दुबईला जात असल्यामुळे त्याच दिवशी हैद्राबादला निघून गेले. दुसऱ्या दिवशी दुपारी त्यांना ते करोनाबाधित असल्याचा अहवाल पाठवण्यात आला. वेळेवर कळल्याने ते आणि त्यांचे नागपुरातील कुटुंबीय घाबरले. काही वेळाने या प्रयोगशाळेतील एका कर्मचाऱ्याने त्यांना १० हजार रुपये दिल्यास अहवाल दुसरा मिळेल असे फोनवर सांगितले. त्यांना त्याच दिवशी दुसऱ्या प्रयोगशाळेचा म्हणजेच मेट्रोलॅब आणि डायग्नोस्टिक सेंटर, धंतोली येथून ते हैद्राबादला असताना त्यांना निगेटिव्ह अहवाल देण्यात आला. दुबईला पोहचल्यानंतर त्यांनी चाचणी केली. तेव्हा त्यांना कुठलाही संसर्ग आढळला नाही. अशाप्रकारे संसर्ग नसलेल्यांना बाधित दाखवून आयसीएमआर, महापालिकेला चुकीचे आकडे देणाऱ्या तसेच लोकांना लुबाडणाऱ्या प्रयोगशाळांवर कारवाई करण्याची मागणी शिवणकर यांनी केली.

Print Friendly, PDF & Email
Share