नक्षलग्रस्त भागात विद्यार्थ्यांच्या ‘सहनशीलनतेची’ परीक्षा! ऑनलाईन पेपरसाठी छत्तीसगड सीमेवर धाव
गडचिरोली 11:
गोंडवाना विद्यापीठातर्फे ८ मार्चला बीएससी व बीएच्या थर्ड सेमिस्टरची ऑनलाईन परीक्षा होती. परंतु अतिदुर्गम व नक्षलग्रस्त कोरची तालुक्यात मागील चार दिवसांपासून बीएसएनएलचे नेटवर्कच नसल्यामुळे ऐनवेळी मोठी धांदल होऊन बऱ्याच विद्यार्थ्यांवर परीक्षेपासून वंचित राहण्याची पाळी आली.
गोंडवाना विद्यापीठाच्या हिवाळी सत्राच्या परिक्षेस प्रारंभ झाला आहे. कोविडमुळे ही परीक्षा ऑनलाईन होत आहे. ८ मार्चला आणि बीएससीची परीक्षा होती. परंतु मोबाईल सेवा विस्कळीत झाल्याने कोरची तालुक्यातील अनेक विद्यार्थ्यांना परिक्षेपासून वंचित राहावे लागले. कोरची तालुक्यातील अनेक विद्यार्थी नेटवर्कच्या शोधात तालुकास्थळापासून २५ किलोमीटर अंतरावर असलेल्या गोंदिया जिल्ह्यातील चिचगड येथे किंवा छत्तीसगड सीमेवर जाऊन ऑनलाईन पेपर देत होते. परंतु तेथेही व्यवस्थित नेटवर्क नसल्याने विद्यार्थ्यांची फजिती झाली.
या गंभीर प्रश्नाबाबत कोरची येथील वनश्री महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. निमसरकार यांच्याशी चर्चा केली असता, कोरची तालुक्यात मागील दोन दिवसांपासून नेटवर्क नसल्याची माहिती गोंडवाना विद्यापीठाला दिली. तरीही विद्यापिठाने ऑनलाईन परीक्षा घेतली. कोरची तालुका छत्तीसगड राज्याला लागून आहे. छत्तीसगडमधील जिओ कंपनीचा नेटवर्क सीमावर्ती भागात काही ठिकाणी असतो. तेथे जाऊन परीक्षा द्या, असे विद्यार्थ्यांना सांगितल्याचे डॉ. निमसरकार म्हणाले.
दूरसंचार अधिकाऱ्यांनाही बसतो फटका….
कोरची तालुक्याच्या निर्मितीपासून या तालुक्यात केवळ भारतीय दूरसंचार विभागाचे नेटवर्क आहे ते कधी बंद, तर कधी चालू असते. तालुक्यात बेतकाठी, मसेली व कोरची या तीन ठिकाणी दूरसंचार विभागाचे मनोरे उभारण्यात आले आहेत. कोरची दूरसंचार विभागाचे केबल भंडारा येथून देवरी-चिचगड मार्गे टाकल्यामुळे नेहमी कोरची येथे दूरसंचार सेवा विस्कळीत होत असते. त्याचा फटका खुद्द दूरसंचार विभागाच्या अधिकाऱ्यांनाही बसतो. सेवा विस्कळीत झाल्यानंतर कोरची येथील भारतीय दूरसंचार विभागाच्या अधिकाऱ्यांना छत्तीसगड राज्यातील नेटवर्क शोधून त्यांच्या वरिष्ठांना माहिती द्यावी लागते.