♦️गतवर्षीच्या तुलनेत १ हजारांची वाढ
गोंदिया : खरीप हंगाम तोंडावर आला आहे. यानंतरही शेतकऱ्यांकडे पेरणी करण्यासाठी आर्थिक तरतूद नाही. या परिस्थितीत खताच्या किमती सातत्याने वाढत आहेत. मार्च ते जून या कालावधीत खताच्या किमती तब्बल पाच वेळेस वाढल्या आहेत. आता सुधारित खताची रॅक बाजारात दाखल होणार आहे. या खतासाठी ५० किलोच्या पोत्याला २४५० रुपये मोजावे लागणार आहेत. गतवर्षीच्या तुलनेत हे दर तब्बल एक हजार रुपयांनी जास्त आहेत. यामुळे शेतशिवारात पेरणी करायची कशी, असा गंभीर प्रश्न पेरणीपूर्वीच शेतकऱ्यांच्या कुटुंबात निर्माण झाला आहे.
खत खरेदीसाठी शेतकरी बाजारात उतरले आहेत. ज्या शेतकऱ्यांकडे पैशाची तरतूद आहे, असे शेतकरीच सध्या खताची खरेदी करू शकत आहेत. मात्र, ज्या शेतकऱ्यांकडे पेरणीकरिता पैसा नाही अशा शेतकऱ्यांना खताच्या बदलत्या किमतीचे आकडेच पाहावे लागत आहेत. मार्च ते जून या तीन महिन्यांत किमती हजार रुपयांनी वाढल्या आहेत, तर अनुदानित खत सर्वसामान्याला मिळेनासे झाले आहे. खताच्या किमती हजार रुपयांनी वाढल्या आहेत. तर अनुदानित खत सर्वसामान्यांना मिळेनासे झाले आहे
अनुदानित खत गेले कुठे?
खरीप हंगाम : ५० किलोच्या पोत्यासाठी आता २४५० रुपये,
बाजारात डीएपी आणि युरिया या दोनच खतांना अनुदान आहे. यात डीएपीची किंमत १३५० रुपये आहे, तर युरिया २६५ रुपयांचा दर आहे. या खताच्या तुलनेत इतर खताचे दर पोत्याला एक हजाराने जास्त आहे. यामुळे शेतकरी अनुदानित खत मिळावे म्हणून धावत आहेत. मात्र, मर्यादित खत साठ्यामुळे प्रत्येक ठिकाणी खत मिळणे अवघड आहे.
असे वाढत गेले दर
१ गतवर्षी १०:२६:२६ या खताचे दर जून महिन्यात १४७० रुपये होते. मार्च महिन्यापासून हे खत पाचवेळा वाढले आहे.
२ मार्च महिन्यात खताचे दर १७२० रुपये होते. यातनंतर हे दर १९००, १९५०, २१५०, २२०० रुपये आणि नव्या रॅकचे दर २४५० रुपये आले आहेत. प्रत्येक रॅकला खताचे दर वाढलेल्या स्वरूपातच पाहायला मिळत आहे. अशीच अवस्था २०:२०:०:१३ खताची आहे.
गतवर्षी हे खत १४०० रुपयांना होते. ५० किलोच्या पोत्याचे दर नंतर १४७५, १५००, १८००, २०००, २१०० आणि आता २१५० रुपयांवर पोहोचले आहे. अनुदानातील खत वगळता जवळपास सर्वच खतांचे दर २००० रुपयांच्या जवळ पोहोचले आहे.







