देवरी- मुरपार (कुंभारटोला) येथे बिबट्याचे दर्शन

देवरी: तालुक्यातील मुरपार जंगल परिसरात आज सकाळी ९:०० वाजेच्या दरम्यान झाडावर बिबट्याचे दर्शन झाल्याने ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

सध्या मोहफूल वेचणीचा हंगाम सुरू असल्याने, मुरपार येथील काही ग्रामस्थ मोहफूल वेचण्यासाठी जंगल परिसरात गेले असता, त्यांना कुसुमाच्या झाडावर बसलेल्या स्थितीत बिबट्याचे दर्शन झाले. लगतच्या झाडावर माकडांचे कळपसुद्धा होते. शिकारीच्या शोधात बिबट्या झाडावर चढलेला असावा असा प्राथमिक अंदाज गावकऱ्यांनी व्यक्त केला आहे.मोहफूल वेचण्यासाठी गेलेल्या ग्रामस्थांनी सदर माहिती गावातील लोकांना दिली. माहिती मिळताच लोकांनी घटनास्थळी धाव घेत मोठी गर्दी केली.

मोहफूल वेचणीचा हंगाम सुरू असल्याने ग्रामस्थ पहाटे दरम्यान जंगल परिसरात जात असतात. यापूर्वी या परिसरातील शिरपूर/बांध भागात बिबट्या दिसून आला होता. मात्र, आज सकाळीच बिबट्याने दर्शन दिल्याने स्थानिकांत भीतीचे वातावरण पसरले आहे.

बिबट्याला हुसकावून लावण्यासाठी लोकांनी अनेक प्रयत्न केले, परंतु दोन ते तीन तास बिबट्या त्या झाडावर बसलेला होता. वन विभाग देवरी येथे ग्रामस्थांकडून माहिती देण्यात आली आहे. या परिसरात बिबट्याला जेरबंद करण्यासाठी त्वरित पिंजरा लावावा, अशी मागणी ग्रामस्थांनी वन विभागाकडे केली आहे.

Share

👇समाचार सुनने के लिए यहां क्लिक करें

और पढ़ें