साकोली: -तालुक्यातील उमरझरी परिसरात मागील महिनाभरापासून वाघिणीने दहशत निर्माण केली असताना, आज पुन्हा एका भीषण घटनेने संपूर्ण परिसर हादरला आहे. विर्शी गावाजवळ वाघाच्या हल्ल्यात ५ वर्षीय बालिकेचा मृत्यू झाल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.
छत्तीसगड राज्यातील सुहेला येथील काशिनाथ मिरी हे आपल्या कुटुंबासह विर्शी येथील संजय कापगते यांच्या शेतात वीटभट्टीच्या कामासाठी आले आहेत. शेतातच त्यांचे तात्पुरते वास्तव्य आहे. आज १५ रोजी पहाटेच्या सुमारास वाघाने काशिनाथ यांच्या ५ वर्षीय मुलगी अंशिका हिच्यावर अचानक हल्ला केला. वाघाने तिला ओढत नेत ठार केल्याची हृदयद्रावक घटना घडली. साकोली तालुक्यात भीतीचे सावट अधिक गडद झाले असून, नागरिकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. मागील महिनाभरापासून उमरझरी परिसरात वाघिणीच्या हालचाली सुरू असल्याच्या घटना समोर येत असताना, आजचा हल्ला हा त्याच वाघिणीचा आहे का, असा प्रश्न उपस्थित होत आहे.
दरम्यान, जर हा हल्ला त्याच वाघिणीने केला असल्याचे निष्पन्न झाले, तर वनविभागासाठी हे मोठे अपयश मानले जाईल. नागरिकांच्या सुरक्षेसाठी तात्काळ ठोस उपाययोजना करण्याची गरज व्यक्त होत आहे.घटनेची माहिती मिळताच वनविभागाचे पथक घटनास्थळी दाखल झाले असून, पुढील तपास सुरू आहे. परिसरात सतर्कतेचा इशारा देण्यात आला असून, नागरिकांना जंगलाच्या परिसरात जाणे टाळण्याचे आवाहन करण्यात आले आहे.








