गोंदिया : वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांविरुद्ध गोंदिया जिल्हा वाहतूक नियंत्रण शाखेने आक्रमक पवित्रा घेतला आहे. वर्ष २०२५ दरम्यान विविध नियमांचे उल्लंघन करणाऱ्या तब्बल ५१ हजार ९९० वाहन चालकांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली असून, यातून ३ कोटी ५७ लाख ५४ हजार २०० रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे. मात्र, इतक्या मोठ्या प्रमाणावर कारवाई होऊनही वाहन चालकांमध्ये शिस्तीचा अभाव दिसून येत असल्याने प्रशासनाने चिंता व्यक्त केली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, ३१ मार्च २०२६ पर्यंत ई-चलान फाडण्यात आलेल्या वाहनांची संख्या ६८० इतकी आहे. केवळ जानेवारी ते डिसेंबर २०२५ या एका वर्षाच्या कालावधीत १ कोटी ३२ लाख रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. ही आकडेवारी स्पष्ट करते की, दंडभरूनही नियमांकडे दुर्लक्ष करणाऱ्यांची संख्या जिल्ह्यात मोठी आहे. अनेक प्रकरणांत अद्यापही लाखो रुपयांचा दंड थकीत असून तो वसूल करणे प्रशासनासमोर मोठे आव्हान ठरत आहे.
सीसीटीव्हीला चकमा देण्याचा प्रयत्न
शहरात प्रामुख्याने तरुण पिढीकडून वाहतूक नियमांचे सर्वाधिक उल्लंघन होत असल्याचे समोर आले आहे. अनेक तरुण सीसीटीव्ही कॅमेऱ्यांच्या नजरेतून वाचण्यासाठी विविध क्लृप्त्या लढवतात. मात्र, पोलिसांकडून ठिकठिकाणी विशेष मोहीम राबवून अशांवर कारवाई केली जात आहे. पालकांच्या दुर्लक्षामुळे तरुण वर्ग बेफामपणे वाहने चालवत असून, रस्ते अपघात रोखण्यासाठी नागरिकांनी स्वतःहून नियमांचे पालन करावे आणि आपल्या पाल्यांना जबाबदारीने वाहन चालवण्यास सांगावे, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.
चालवल्यास केवळ १०० रुपयांचा किरकोळ दंड होतो, असा एक चुकीचा समज नागरिकांमध्ये आहे. प्रत्यक्षात हा गंभीर गुन्हा असून यासाठी भारी दंड आणि कायदेशीर कारवाई होऊ शकते, असा इशारा वाहतूक विभागाने दिला आहे.
वाहतूक शाखेने स्पष्ट केले आहे की, ई-चलान कापल्यानंतर संबंधित व्यक्तीने वेळेत दंड न भरल्यास, ती व्यक्ती पुन्हा पोलिसांच्या हाती लागताच मशीनद्वारे तिचा जुना सर्व रेकॉर्ड समोर येतो. अशा परिस्थितीत संबंधित वाहन तात्काळ जप्त केले जाते आणि थकीत दंडाची संपूर्ण रक्कम भरल्यानंतरच वाहन सोडले जाते. बकायेदारांना नोटीस बजावण्याची प्रक्रियाही सुरू असून याचा सर्व रेकॉर्ड मुंबई येथील मुख्य कार्यालयात नोंदविला जात आहे.








