गोंदिया: जिल्ह्यात सध्या खरीप हंगामातील पिकांच्या संरक्षणासाठी तणनाशकांचा मोठ्या प्रमाणावर वापर केला जात आहे. मात्र, याच संधीचा फायदा घेत छत्तीसगड राज्यातील काही कंपन्यांकडून बनावट आणि निकृष्ट दर्जाच्या कृषी औषध व तणनाशकांचा मोठ्या प्रमाणावर पुरवठा केला जात आहे. महागडी तणनाशके फवारूनही शेतातील तण नष्ट न होता उलट धान पिकालाच याचा फटका बसत असल्याचा धक्कादायक प्रकार गोरेगाव तालुक्यातील कुर्हाडी येथील एका शेतकर्यांच्या शेतात दिसून आला आहे. याप्रकरणी पिडीत शेतकर्यांने कृषी विभागाकडे तक्रार केली असून संबंधित कंपनीवर कारवाईची मागणी केली आहे.
जिल्ह्यात उन्हाळी धान पिकाची लागवड करण्यात आली असून सद्या धान गर्भावस्थेत आहे. दरम्यान, शेतकर्यांकडून मजुरांची टंचाई आणि वेळ वाचवण्यासाठी तणनाशकांचा पर्याय निवडला जात आहे. मात्र, बाजारात कमी किमतीत उपलब्ध असलेल्या आणि छत्तीसगडमधील काही कंपन्यांच्या तणनाशकांचा वापर केल्यावर कोणताच परिणाम दिसून आला नाही. गोरेगाव तालुक्यातील कुर्हाडी येथील शेतकरी चोकलाल जोगीलाल वाळवे यांनी आपल्या गावातीलच पोंगेझरा फॉर्मर प्रोड्यूसर कंपनी नावाच्या कृषी केंद्रातून ‘युनी सेट व अलमोक्स’ नावाचे तणनाशक खरेदी करून शेतात फवारणी केली. मात्र, काही दिवसांतच त्यांना धक्कादायक अनुभव आला. ज्या तणाचा नायनाट होणे अपेक्षित होते, मात्र, या औषधांमुळे तणाची वाढ होताना व धानाची वाढ खुंटत असल्याचे दिसून आले. यावर त्यांनी कृषी केंद्र संचालक व संबंधित कंपनीच्या प्रतिनीधीशी संपर्क साधून घडलेल्या प्रकाराविषयी सांगितले. मात्र, कंपनीच्या प्रतिनिधीकडून त्यांना उडवा-उडवीची उत्तरे देण्यात आली. दरम्यान, त्यांनी गोरेगाव येथील तालुका कृषी अधिकारी यांच्याकडे तक्रार दाखल करून कारवाईची मागणी केली आहे. तर शेतकारी वाळवे यांच्याप्रमाणेच अनेक शेतकर्यांची फसवणूक होण्याची शक्यता नाकारता येत नसून या प्रकरणाची चौकशी करून योग्य ती कारवाई करण्याची मागणी शेतकरी वाळवे यांच्यासह परिसरातील शेतकर्यांनी केली आहे.








